पिंपळे गुरव(पुणे) : शाळेच्या पहिल्या दिवशी पिंपळे गुरव प्राथमिक महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून तसेच औक्षण करत उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी लहानग्या मुलाच्या चेहर्यावर हसू आणि आसू दिसून आले. गुरुवारी सकाळपासून महापालिका शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. शाळेतील वर्ग रंगबेरंगी फुग्यांनी सजवले होते. शाळेचे प्रवेशद्वार आणि आवारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
सुरुवातीला इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव गावठाणापर्यंत प्रभातफेरी काढली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके या वेळी देण्यात आले. पहिल्या दिवशी वर्गानुसार अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका साधना वाघमारे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
मावळ आणि उपनगरांतील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून औक्षण करण्यात आले. तसेच, मुलांना मिठाई, चॉकलेटचे वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी पाठपुस्तक आणि गणवेश दिल्यामुळे विद्यार्थी आनंदीत दिसत होते.
शाळाबाह्य मुलांचे शाळेतील प्रमाण वाढविण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरी भेट देण्यात आली होती. शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांना शासनाच्या विविध योजनांविषयक माहिती देण्यात आली.
– साधना वाघमारे, मुख्याध्यापिका, पिंपळे गुरव महापालिका शाळा
हेही वाचा