सासवड; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे सद्गुरू नारायण महाराज व पोपट महाराज (टेंबे स्वामी) यांच्या आधिपत्याखाली तीन दिवसांचा अभूतपूर्व दत्त जयंती सोहळा बुधवारी (दि. 7) पार पडला. सकाळी 10.30 वाजता चंद्रभागा कुंडावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे मुखवटे व पादुका चंद्रभागा स्नान व अभिषेक, तसेच सद्गुरू नारायण महाराजांच्या रथावर, चंद्रभागा कुंडावर, तसेच पालखी व दत्त मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन चंद्रभागास्नानाने दत्तजयंती सोहळा सांगता झाली.
बुधवारी पहाटे 4 वाजता नारायणेश्वर मंदिर, दत्त मंदिर आणि पादुका यांचे रुद्राभिषेक करण्यात आले. त्यानंतर सहा वाजता पूर्णिमा हवन व 8.30 वाजता आरती झाली, तसेच 9 वाजता पालखीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे मुखवटे ठेवून ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली. दर्शनासाठी हजारो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
दरम्यान, 10 वाजता चंद्रभागा कुंडावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे मुखवटे व पादुका यांचा दही, दूध, पंचामृताचा अभिषेक व दत्तांना चंद्रभागास्नान वीरेंद्र जैन, संभाजी झेंडे, सुनील काटे, पृथ्वीराज भिंताडे, तसेच सत्तूशेठ सरदार यांच्या हस्ते घालण्यात आले. यांसह भाविक, शिष्यगण, तसेच हत्ती, घोडे, उंट यांसह राज्याच्या विविध भागांतून आलेले पारंपरिक ढोल -लेझीम पथक, बँडपथक, झांजपथकासह भव्य मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा झाली.
दुपारी 1 वाजता गजराजाने पालखीवर व नारायण महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी केली. या वेळी दिगंबरा दिगंबरा जयघोष करण्यात आला. पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर देवभेट व आशीर्वाद कार्यक्रम झाला. नंतर नारायण महाराज यांनी मार्गदर्शन केले. दुपारी 2 वाजता आरती झाली व दत्त भक्तांसाठी मादुगिरी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी दत्त मंदिराच्या सभोवती आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट, विदयुत रोषणाई करण्यात आली होती. भजनाचा कार्यक्रम व रात्री 12 वाजता आरती व महाप्रसादाने सोहळा पार पडला, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी दिली.
या वेळी पांचीलाल मेढा, डॉ. उमेश डोंगरे, मुकेश शर्मा, तात्यासाहेब भिंताडे, पंडित साबळे, बबन टकले, बापूसाहेब भिंताडे, ग्रामसेवक रोहित अभंग, सरपंच चंद्रकांत बोरकर, रामभाऊ बोरकर, एम. के. गायकवाड, दादा भुजबळ, प्रशांत पाटणे, बाळासाहेब भिंताडे, प्रदीप बोरकर, श्रीनाथ बोरकर, मारुती बोरकर, योगेश खेनट आदी उपस्थित होते.