बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात बुधवारी (दि. 20) फुलांची आवक घटल्याचे चित्र दिसून आले. लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फुलांना प्रचंड मागणी आहे.
परंतु, तीव उन्हाचा परिणाम फुलशेतीवर झाला असून, त्यामुळे आवक मात्र कमालीची घटली आहे. फुलांना चांगली मागणी मिळाल्याने बाजारभावात तेजी दिसून आली. विशेषतः बॉडेक्स गुलाबाला सर्वाधिक 190 रुपये दर मिळाला. परिणामी उत्पादकांनी समाधान व्यक्त केले.
जळोची उपबाजारात झेंडूची अवघी 60 किलो आवक झाली. झेंडूला प्रतवारीनुसार किमान 10 रुपये, कमाल 55 रुपये तर सरासरी 40 रुपये दर मिळाला. गुलछडीची 10 किलो आवक झाली असून, या फुलाला 20 ते 60 रुपये दर मिळाला. सरासरी भाव 40 रुपये राहिला.
आस्टर फुलांची 15 किलो आवक झाली असून, या फुलाला 70 ते 100 रुपये दर मिळाला. सरासरी दर 85 रुपये राहिला. बॉडेक्स गुलाबाच्या 5 पेंडी बाजारात दाखल झाल्या. या गुलाबाला किमान 50 रुपये तर कमाल 190 रुपये दर मिळाला. सरासरी भाव 140 रुपये राहिल्याने या प्रकारच्या गुलाबाला ग््रााहकांकडून मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले.
उमला गुलाबाची 5 किलो आवक झाली. या फुलाला 20 ते 50 रुपये दर मिळाला असून, सरासरी भाव 35 रुपये राहिला. शेवंती भाग्यश्रीची 10 किलो आवक झाली. या प्रकाराला 30 ते 100 रुपये दर मिळून सरासरी भाव 70 रुपये राहिला. दरम्यान, पर्पल शेवंतीच्या 5 पेंडी बाजारात दाखल झाल्या.
या फुलाला 80 ते 120 रुपये दर मिळाला असून, सरासरी भाव 100 रुपये राहिला. त्यामुळे सजावटीच्या फुलांना ग््रााहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले; मात्र, उमला/शिळी छडी, गलांडा, लिली, ग्लॅडिएटर गुलाब, बॉडेक्स तुकडा, दिवाईन गुलाब, पासली, बिजली, मोगरा, शेवंती पौर्णिमा, शेवंती सेंट व्हाईट आणि डबल शेवंती या फुलांची आवक झाली नसल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले. फुलांचे लिलाव दररोज दुपारी 12 वाजता सुरू होत असून, उत्पादकांनी त्यानुसार माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन समितीने केले.
भुसार धान्याचे भाव स्थिर
गुरुवारी (दि. 21) आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार समितीच्या मुख्य यार्डात भुसार धान्याचे लिलाव पार पडले. गावरान ज्वारीला 2800 ते 4660 रुपये आणि सरासरी 3200 रुपये असा दर मिळाला. हायबीड ज्वारीला 2 हजार ते 2650 रुपये व सरासरी 2550 रुपये असा दर मिळाला. मालदांडी बाजरीला 2550 ते 3100 व सरासरी 2900 रुपये दर मिळाला.
हायबीड बाजरीला 2 हजार ते 2600 व सरासरी 2500 रुपये दर निघाले. 2189 जातीच्या गव्हाला 2200 ते 2700 रुपये व सरासरी 2400 रुपये दर मिळाला. लोकवन गव्हाला 2 हजार ते 2351 रुपये व सरासरी 2300 रुपये दर मिळाला. जाडा हरभर्याला 5100 रुपये ते 5790 व सरासरी 5700 रुपये तर गरडा हरभर्याला 5 हजार ते 5660 व सरासरी 5600 रुपये क्विंटल असा दर मिळाला. तांबड्या मकेला 1900 ते 2100 रुपये व सरासरी 2 हजार असा दर मिळाल्याचे समितीकडून सांगण्यात आले.