पुणे: मान्सूनचा हंगाम सुरू होण्याआधीच राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र, मान्सून हंगामात यंदा राज्यात सरासरी 105 टक्के अंदाज आहे. त्यातही मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पूरस्थितीचा इशारा हवामान विभागाने एप्रिल महिन्यात दिलेल्या अंदाजात दिला आहे.
त्या भागात मान्सून हंगामात 110 ते 115 टक्के पाऊस होईल, असा दावा हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने केला आहे. दरम्यान, मान्सूनच्या दोन्ही शाखा जोरदार सक्रिय झाल्याने तो संपूर्ण देश विक्रमी वेळेत काबीज करेल, असा अंदाज आहे. (Latest Pune News)
15 एप्रिल रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आर. रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी हा अंदाज दिला होता. त्यांनी खास महाराष्ट्राबाबत अंदाज व्यक्त करताना उपग्रहाने दिलेले फोटोच सादर केले. त्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला होता.
हे अंदाज मे महिन्यापासूनच अचूक ठरले. कारण, मराठवाड्यात अन् मध्य महाराष्ट्रात 300 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अजून मान्सून दाखल व्हायचा आहे. हे अंदाज खरे तर जून ते सप्टेंबर या दीर्घ पल्ल्यासाठी दिले आहेत. आता पुढचा अंदाज मेअखेर हवामान विभाग देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मान्सून विक्रमी वेळेत देश पादाक्रांत करेल
गुरुवारी (दि. 22) मान्सूनने अरबी समुद्रातून केरळच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ प्रवेश केला, तर मान्सूनची दुसरी शाखा ही पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ येऊन धडकली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात यंदा मान्सून अतिशय वेगाने पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी काही दिवसांत तो संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्र अन् पश्चिम बंगाल काबीज करून मध्य भारत आणि पूर्वोत्तर भारत गाठून दिल्लीपर्यंत प्रचंड वेगाने मजल मारेल, असे चित्र यंदा दिसत आहे. यंदा अतिशय विक्रमी वेळात तो संपूर्ण देश काबीज करण्याच्या तयारीत दिसत आहे.
दोन शाखा झाल्या जोरदार सक्रिय
अंदमान-निकोबार सागरात त्याची निर्मिती होते आणि तो प्रथम हिंदी महासागरातून अरबी समुद्रात येतो. पुढे अरबी समुद्रातूनच केरळमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो बंगालच्या उपसागरातून पूर्व किनारपट्टीकडून पश्चिम बंगाल राज्यात प्रवेश करतो. ही शाखा थोडी उशिरा सक्रिय होते. मात्र, यंदा मान्सून सक्रिय झाल्यापासून अवघ्या दोनच दिवसांत बंगालच्या शाखेने जोरदार मुसंडी मारत गुरुवारी प.बंगालच्या सीमेजवळ प्रवेश केला.
कमी दाबाच्या पट्ट्यांची कमाल
भारतात एकाच वेळी दोन्ही शाखांद्वारे मान्सून जोरदार मुसंडी मारत आहे. त्यामुळे अल्प कालावधीत संपूर्ण देश मान्सून व्यापून टाकेल, असे चित्र आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून जबरदस्त वेगाने मुसंडी मारत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
केरळच्या किनारपट्टीवर तो सध्या थांबलेला असून, आगामी 24 ते 48 तासांत तो केरळ राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. साधारणत: 25 मेपर्यंत तो केरळ किनारपट्टीवर येईल; तर पश्चिम बंगालमध्ये तो आगामी 24 तासांतच दाखल होईल, असाही अंदाज दिसत आहे.
महाराष्ट्रात 31 मे ते 1 जूनला येण्याची शक्यता
महाराष्ट्रात मान्सून मेच्या अखेरीस म्हणजे 28 ते 31 मेच्या दरम्यान दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. दरवर्षी मुंबई-पुण्यात मान्सून 10 ते 12 जूनच्या दरम्यान दाखल होतो. मात्र, यंदा तो 31 मे ते 1 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.
उन्हाळी हंगामात झालेला एकूण पाऊस (मि.मी.)
सातारा 337, रत्नागिरी 309, माथेरान 224, पुणे 142.7, कोल्हापूर 157.2, ठाणे 129.4, नांदेड 104.4, नाशिक 151, धाराशिव 166.9, बुलडाणा 124, जेऊर 157.4, सांगली 183.1, हरणाई 80.7, बारामती 68.3, जळगाव 23.4, अहिल्यानगर 89, सोलापूर 119, बीड 62.8.
उन्हाळी हंगामातील दहा वर्षांतला विक्रमी पाऊस
महाराष्ट्र : 341 टक्के (सरासरी : 19.7 टक्के, पडला : 86.9 टक्के)
कोकण : 1,338 टक्के (सरासरी : 12.9 टक्के, पडला : 185.5 टक्के)
मध्य महाराष्ट्र : 281 टक्के (सरासरी : 18.7 टक्के, पडला : 71.3 टक्के)
मराठवाडा : 221 टक्के (सरासरी : 19.1 टक्के, पडला : 65.3 टक्के)
विदर्भ : 325 टक्के (सरासरी : 23.9 टक्के, पडला : 101.5 टक्के)