पुणे

Pune news : उत्साहाला उधाण ! देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून गणेशभक्तांची गर्दी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सलग तीन दिवसांच्या धुवाधार पावसाने सायंकाळी दिलेली उघडीप…रविवारची साप्ताहिक सुटी….घरच्या गौरी-गणपतींचे विसर्जन, असा दुग्धशर्करा योग साधून पुण्यासह राज्यातील गणेशभक्तांनी देखावे पाहण्यासाठी रविवारी पुण्यात तुफान गर्दी केली. त्यामुळे जणू रस्त्यालाच पाय फुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यभरातून आलेल्या भक्तांमुळे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असल्याचे भासत होते. रविवारी दुपारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यानंतर सायंकाळच्या सुमारास पावसाने थोडीशी उघडीप घेतली. मात्र, मध्यवस्तीत रात्रीच्या सुमारास काहीवेळ रिमझिम पाऊस बरसताना पाहायला मिळाला. असे पावसाचे वातावरण असतानादेखील पुणेकरांचा बाप्पांचे देखावे पाहण्याचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.

हाती लाल फुगा, डोक्यावर टोपी, तोंडात शिट्टी आणि आपल्या कुटुंबीयांचा हात धरून देखावे पाहण्यासाठी कुटुंबीयांसह चिमुकल्यांची लगबग पाहायला मिळाली. बाजीराव रस्त्यावर चिंचेची तालीम, नातूबाग, हिराबाग, मंडई, बाबू गेनू, भाऊ रंगारी, भिकारदास मारुती, नवी पेठ यासह शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता यांसह उपनगरीय भागांत गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले तसेच देखावे पाहण्यासाठी आलेले भाविक आपल्या मोबाईलमध्ये देखाव्यांचे रेकॉर्डिंग करत होते.

टिळक रस्त्यावर कोंडी
बाजीराव रस्त्याकडे जाणारा रस्ता पूरम चौकात पोलिसांनी बॅरीकेड्स लावून बंद केल्यामुळे टिळक रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण रस्ता वाहनांच्या गर्दीने भरलेला दिसून आला. त्यामुळे मध्यवस्तीतील गल्लीबोळातदेखील सायंकाळच्या सुमारास वाहनांची कोंडी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT