मांडवगण फराटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र दिनानिमित मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ध्वजारोहण केले नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणुन साजरा केला जातो. यादिवशी सर्व सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वज फडकविला जातो.
परंतु मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे पाच ते सहा महिन्यापुर्वी उदघाटन झाले होते. त्यामुळे नवीन इमारत असतानाही येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यालयात ध्वजारोहण का केलं नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा सातपुते यांनी सांगितले की, पहाटे एक वाजल्यापासून ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुंतागुंतीची प्रसूती महिला रुग्ण ऍडमिट असल्यामुळे मला रुग्णाजवळ थांबणे गरजेचे होते. तसेच ध्वजारोहन करण्यासाठी उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने जास्त वारा सुटल्यानंतर त्याचा आवाज येत होता. ध्वजस्तंभ हालत असल्याने ध्वज फडकविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन आम्ही ध्वज फडकविला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल माफी ही मागितली आहे.