पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन होऊन आज पाच वर्षे पूर्ण झाले आहेत; मात्र अजूनही येथील मूलभूत समस्या सुटल्या नाहीत. आयुक्तालयाला स्वतःच्या हक्काची स्वतंत्र इमारत मिळाली नाही. याव्यतिरिक्त बॉम्बशोधक/नाशक आणि श्वानपथक सुरू करण्यात आले नाही. याव्यतिरिक्त पोलिस ठाण्यांसह अनेक प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडले आहेत. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहर आयुक्तालयातील दहा, तर ग्रामीण हद्दीतील पाच पोलिस ठाणी मिळून 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली; मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने (1 जानेवारी 2019) पासून प्रेमलोक पार्क येथील शाळेची दुमजली इमारत भाड्याने घेण्यात आली. येथून शहरातील कायदा व सुव्यव्यस्थेवर निगराणी ठेवली जात आहे.
चिंचवड प्रेमलोक पार्क येथील सर्व्हे नंबर 165 व 166 मधील महात्मा ज्योतिबा फुले शाळेची (इंग्लिश मीडियम स्कूल) इमारत पोलिस आयुक्तालयासाठी भाड्याने घेण्यात आली आहे. या शाळेच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 4427. 50 चौरस मीटर असून, इमारत बांधकाम क्षेत्रफळ 2205. 13 चौरस मीटर आहे. मुख्यालय निगडी येथील कै. अंकुश बोर्हाडे शाळेच्या इमारतीत आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 676. 17 चौरस मीटर असून मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ 3118. 34 चौरस इतके मीटर आहे.
आयुक्तालयासाठी चिखली येथील 3. 39 हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. नगर विकास विभागाने पीएमआरडीए कडून अभिप्राय मागवला आहे. ही प्रक्रिया पार पडल्यास या जागेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. पोलिस मुख्यालयासाठी देहूतील विठ्ठलनगर येथील गट क्रमांक 97 येथील 20 हेक्टर जागेची मागणी केली असून, प्रस्तावही पाठवला आहे. या जागेचा प्रस्तावही शासनदरबारी प्रलंबित आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी चिखली येथील जागेची मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याच्यासह अन्य प्रस्तावही शासनदरबारी प्रलंबित आहेत.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय
15 ऑगस्ट 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ 115 चौ. किमी इतके आहे. आयुक्तलयात अंदाजे 40 लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. आयुक्तालयात एक महापलिका, 4 नगरपालिका/नगरपंचायत, 120 ग्रामपंचायती आणि एक कॅन्टोमेंट बोर्ड येते. या व्यतिरिक्त देहू, आळंदी ही तीर्थक्षेत्रेदेखील आयुक्तालयाच्या हद्दीत येतात.
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात 6 मोठ्या एमआयडीसी आहेत. त्यामुळे येथे झपाट्याने शहरीकरण होत आहे. परराज्यातील कामगारांचे वास्तव्य असल्याने येथे संमिश्र लोकसंख्या आहे. अयोद्योगिक परिसरात खंडणी, अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी, जमिनीचा अवैध कब्जा, अतिक्रमण, सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण, संघटित गुन्हेगारी, अशी आव्हाने येथील पोलिसांसमोर आहे.