पुणे

पुणे शहरासाठी पाच टीएमसी पाणी आरक्षित! मे महिन्यात पाणीकपात नाही

Laxman Dhenge

पुणे : खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी असला, तरी जलसंपदा विभागाने पुणे शहरासाठी पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आरक्षित ठेवले आहे. त्यामुळे पुणे शहरात मे महिन्यात पाणीकपात होणार नाही. ग्रामीण भागात शेतीला पाण्याची मागणी वाढल्याने, सध्या सिंचनासाठी सुरू असलेले उन्हाळी आवर्तन दहा मेपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणुकीचे मतदान होईपर्यंत पुण्यात पाणीकपात होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त पुढारीने दोन महिन्यांपूर्वी दिले होते. तसेच, जलसंपदा विभागाने नियोजन केल्याने, तसेच पुणे महापालिकेनेही पाण्याचा वापर काटकसरीने केल्यामुळे धरण साखळीत गतवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी असला, तरी ग्रामीण आणि शहरी भागाची मागणी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे वृत्त 'पुढारी'ने गेल्या महिन्यात दिले होते.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत एकूण 29 टक्के पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांची मागणी असल्यामुळे चार मार्चला सुरू झालेले उन्हाळी आवर्तन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या मध्याला पावसाला सुरुवात झाल्यास पाण्याची मागणी कमी होते. मे महिनाच पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, त्या महिन्यात किमान तीन टीएमसी पाणी वापरले जाईल. जूनमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी लागेल. त्यामुळे जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाल्यास, पुण्यात पाणी कपातीची गरज लागणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पुणे शहराला 15 जुलैपर्यंत साडेचार टीएमसी पाण्याची गरज आहे. जुलैअखेरपर्यंत सव्वापाच टीएमसी पाणी लागेल. त्या दृष्टीने नियोजन म्हणून पुणे शहरासाठी पाच टीएमसी पाणी प्रकल्पाच्या जलाशयात राखून ठेवण्यात आले आहे. जुलैमध्ये जलाशयात पावसाचे पाणी जमा होऊ लागल्यास, ग्रामीण भागातील पाण्याची जादा मागणी पुरविता येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

खडकवासला प्रकल्पात साडेआठ टीएमसी पाणी असून, सिंचनासाठी दहा मेपर्यंत आणखी दीड टीएमसी पाणी लागेल. अर्धा ते पाऊण टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. यंदा वेळेवर आणि पुरेसा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सुमारे साडेसहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. पुढील अडीच महिन्यांत पुणे शहराला पाणी त्यातून देता येईल, तसेच काही पाणी ग्रामीण भागातही पिण्यासाठी देता येईल.

– श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला विभाग.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT