शहरात होणार नवीन पाच ‘भरोसा सेल’; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती  Pudhari
पुणे

शहरात होणार नवीन पाच ‘भरोसा सेल’; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

प्रत्येक परिमंडलात एक ‘भरोसा सेल’ होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात महिला हिंसाचाराच्या घटना वाढत असताना अशा पीडित महिला व पुरुषांना ‘भरोसा सेल’ हा आधार ठरत आहे. मात्र, शहराबरोबर उपनगरे वाढत असताना तक्रारींचा ओघही ‘भरोसा सेल’कडे वाढत आहे. त्याच धर्तीवर तक्रारदारांना तत्काळ न्याय मिळण्यासाठी प्रत्येक परिमंडलामध्ये एक अशा शहरात पाच ‘भरोसा सेल’ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिस आयुक्तालयातून चालणार्‍या ‘भरोसा सेल’कडे 2024 मध्ये 4 हजार 354 तक्रार अर्ज आले होते. त्यातील 3 हजार 504 तक्रारी या महिलांना होणार्‍या त्रासाच्या, तर 850 तक्रारी पुरुषांना होणार्‍या त्रासाच्या होत्या. या तक्रारींपैकी 4 हजार 124 तक्रारी ‘भरोसा सेल’कडून निकाली काढण्यात आल्या, तर 230 तक्रारी प्रलंबित होत्या.

चालू वर्षात 2025 मध्ये तीन महिन्यांत 983 तक्रार अर्ज आले. त्यातील 808 तक्रारी पीडित महिलांच्या, तर 175 तक्रारी या पीडित पुरुषांनी केल्या आहेत. यातील 481 तक्रारींचा निपटारा झाला असून, अजूनही 502 तक्रारी प्रलंबित आहेत.शहरात पोलिस आयुक्तालयातून ‘भरोसा सेल’चे काम चालत होते.

अनेक तुटणारे संसार ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून पुन्हा जुळले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये खरेच अन्याय झाला आहे, अशी प्रकरणे गुन्हा दाखल करण्यासाठी वेळोवेळी संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणार्‍या समुपदेशनावर नागरिकांचाही भरोसा वाढला आहे. तक्रारींना तारीख पे तारीख पडू नये, यादृष्टीने पोलिस आयुक्तांनी नव्याने पाच ‘भरोसा सेल’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT