पुणे

नारायणगाव : फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक

अमृता चौगुले

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: हॉस्पिटॅलिटी आणि हॉलिडे कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून १ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अफताफ इरफान पठाण, श्वेता विरेंद्रकुमार जैस्वाल, स्नेहल विरेंद्रकुमार जैस्वाल, संदीप रमेश गुप्ता, विजय चंद्रपाल मेबाती (सर्व रा मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे असून या बाबतची फिर्याद विशाल बबन सस्ते (वय २७ व्यवसाय शेती रा. कोळवाडी पो . मड, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २८ मार्च ते १३ ऑगस्ट २०२२ या काळात आरोपींनी आम्ही अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनीचे व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे एजंट असून तुम्हाला आमच्या कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर भेटणार आहे.

त्यामध्ये तुम्हाला हॉलिडे तिकिट्स, गणपतीची चांदीची मूर्ती आणि किचन आर्टिकल असे भेट वस्तू भेटणार आहेत. असे सांगून फिर्यादी यांना विश्वासात घेऊन त्यांना कोणतीही सुविधा न देता त्यांचा विश्वासघात करून कंपनीची खोटी माहिती देऊन फिर्यादींची ४० हजार रुपये रोख व ६० हजार रुपये क्रेडिट कार्ड द्वारे असे एकूण १ लाख रुपयांची व इतर लोकांची आर्थिक फसवणूक कंपनीचे डायरेक्टर व एजंट यांनी करून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या नाही म्हणुन अनंतारा हॉस्पिटॅलिटी कंपनी व रेड सीजन हॉलिडे कंपनीचे एजंट व डायरेक्टर यांच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक जगदेवप्पा पाटील करीत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अनंतारा हॉस्पिटॅलिटी व रेड सिजन हॉलिडे कंपनीच्या डायरेक्टर व एजंट यांनी तालुक्यातील इतरही लोकांची फसवणूक केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे अशा प्रकारची फसवणूक नारायणगाव परिसरात व तालुक्यात कुणाची झाली असेल तर त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधावा

                        पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक, नारायणगाव

SCROLL FOR NEXT