लोणावळा : तोतया व्यक्ती उभी करून त्याचे मूळ व्यक्तीच्या नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून त्या आधारे जमिनीचा दस्त काढून घेऊन जमिनीचा व्यवहार करणार्या पाच जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. जमिनीचे मूळ मालक अभय जसानी यांच्या वतीने रतन मोतीराम मराठे (रा. भुशी, लोणावळा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पवन मावळातील काले या गावातील जमीन गट नंबर 404 क्षेत्र 1 हेक्टर 56 आरचे मूळ मालक अभय जसानी या नावाने खरेदी केलेला मूळ दस्त जसानी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयामधून घेतला नाही, याची माहिती मिळताच मावळातील काही जणांनी सदरचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतले. एका वयस्कर व्यक्तीला अभय जसानी म्हणून उभा करण्यात आले. त्यापूर्वी अभय घनशाम जसानी यांच्या नावाने बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून घेण्यात आले होते.
6 आक्टोबर 2022 रोजी लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन अभय जसानी याचे नाव धारण केलेली व्यक्ती लालजीभाई भानुप्रसाद अधिया (वय 62, रा. मुंबई) हा खरा आहे, असे सांगून त्यास आकाश वसंत ठाकूर (रा. पेण), अमोल कृष्णा दाभोळकर (रा. अंधेरी, मुंबई), रवी दशरथ कालेकर (रा. कुसगाव) यांनी ओळख दाखवून अविनाश नथुराम होजगे (रा. लोणावळा) यांनी मध्यस्ती करून मधुसूदन शोभाचंद तापडिया (रा. ठाणे) व विजय बलराम शर्मा (रा. मुंबई) यांनी संगनमत करून जमीन खरेदी केली.
आरोपींनी याअगोदर अशाप्रकारे किती गुन्हे करून जनतेची फसवणूक केली आहे. याबाबत कसून तपास चालू आहे. अशाप्रकारे मावळ परिसरामध्ये यापूर्वीसुध्दा अशाप्रकारे बरेच लोक जमिनीवर डोळा ठेवून त्या जमिनीमध्ये कोणी येत-जात नसल्याची माहिती घेऊन त्या जागेवर दुसरा इसम उभा करून आपापसात खरेदी -विक्रीचे व्यवहार करीत असल्याबाबत तक्रारी दाखल आहेत. यापुढे जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल, तर संबंधित पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.