Pune Politics: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील मतदारांनी महायुतीला घवघवीत यश दिले, तर महाविकास आघाडीला नापसंती दर्शवत पराभवाचा धक्का दिला. विधानसभेच्या यशामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप व महायुतीतील घटकपक्षामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे इनकमिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रक्रियेची अखेर सुरुवात झाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या पाच जणांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते
बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वांनी मार्गक्रमण केले, याचा मनस्वी आनंद आहे. प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यत पोहचवावीत.
मोहोळ म्हणाले, पुणे शहरात भाजपचा मोठा परिवार आहे. या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो. चंद्रकांत पाटील म्हणाले, नव्या-जुन्यांची सांगड घालून पक्षवाढीसाठी प्रयत्न करा. आपल्या परिसराचा वेगवान विकास साध्य होईल.