पुणे

‘108’चा साडेपाच लाख रुग्णांना लाभ; नवसंजीवनी सेवेची दशकपूर्ती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हृदयविकाराचा झटका, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, अपघातातील रुग्णांना अतितातडीच्या उपचारांची गरज असते. पुण्यात गेल्या दहा वर्षांमध्ये पाच लाख 58 हजार रुग्णांना '108' मोफत रुग्णवाहिकांमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. शासनाने 2014 मध्ये डायल 108 मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. दशकपूर्ती करत असलेल्या या सेवेने आतापर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

बीव्हीजी आणि राज्य सरकारचा यांच्या संयुक्त विद्यमाने '108' रुग्णवाहिका उपक्रम सुरू करण्यात आला. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना गेल्या दहा वर्षांत आठ लाख 82 हजार 452 रुग्णांना पुण्यात मोफत रुग्णवाहिकेची सेवा दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे वैद्यकीय आणीबाणीचे व त्या खालोखाल प्रसूतीचे आहेत. अतितातडीच्या उपचारांनंतर रुग्णवाहिकेचा सर्वाधिक लाभ प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना झाला आहे.

एकूण रुग्णांच्या तुलनेत यांची संख्या 16 टक्के आहे. दवाखान्यात घेऊन जात असताना काही महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच सुखरूपरीत्या झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या अपघातामधील 33 हजार 891, हल्ल्यामधील पाच हजार, जळीत घटनांतील 2030, हृदयविषयक आजारांचे 4984, उंचावरून तसेच खाली पडल्यामुळे 13 हजार 303, विषबाधेचे 9 हजार 300 रुग्ण आहेत.

डायल 108 ही रुग्णवाहिका सेवेअंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात 82 रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी क्रिटिकल केअर सुविधा असलेल्या 24, तर ऑक्सिजनयुक्त सुविधा असलेल्या 58 इतक्या रुग्णवाहिका आहेत. आतापर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात
8 लाख 82 हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.

– डॉ. प्रियांक जावळे, व्यवस्थापक, डायल 108, पुणे जिल्हा

हेही वाचा

SCROLL FOR NEXT