नानगाव; पुढारी वृत्तसेवा : भीमा व मुळा-मुठा नदीपात्रातील जलपर्णी दरवर्षी मच्छीमार व्यावसायिकांची डोकेदुखी ठरत असते. जलपर्णीच्या कालावधीत मच्छीमारी ठप्प पडून कुटुंबांची आर्थिक घडी कोलमडून पडते. त्यामुळे जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मुळा-मुठा व भीमा नदीकाठच्या गावांमध्ये काही नागरिक मासेमारी व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. जानेवारी महिन्यापासून नदीपात्रात हळूहळू वाढणारी जलपर्णी मोठ्या पावसानंतर वाहून जाते. मात्र, या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत मासेमारी करणार्या कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
दौंड व शिरूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांत मासेमारी व्यवसाय केला जातो. अनेक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. पूर्वी एकाच प्रकारची जलपर्णी होती. ती देखील मोठ्या प्रमाणावर नसल्याने जलपर्णी नदीपात्रात आल्यावर मासेमारी करणे तेवढे अवघड होत नव्हते. मात्र, सध्या नदीपात्रात दोन प्रकारच्या जलपर्णी असून, नदीपात्र पूर्णपणे झाकून जात आहे.
मासेमारीसाठी नदीपात्रात जावे लागते. होडीत जाळे व मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य घेऊन नदीपात्रात जावे लागते. मात्र, नदीपात्र खचाखच भरलेल्या जलपर्णीमुळे होडी कडेलाच अडकून बसते. जलपर्णीमुळे होडी आतही जात नाही. त्यामुळे मासे पकडण्यासाठी अडचण येते.
मच्छीमारांसह सामान्य नागरिकांनाही अडचण
जलपर्णीची ही समस्या फक्त मासेमारी व्यवसाय करणार्यांसाठीची नसून यामुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. नदीकाठच्या गावांना जलपर्णी सडल्यावर दुर्गंधीला सामोरे जावे लागते. जलचर मृत्युमुखी पडतात, तर डासांपासून होणार्या आजारांचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अनेक दिवसांपासून सतावणारी ही जलपर्णीची समस्या कायमस्वरूपी हद्दपार करावी, अशी मागणी नदीकाठच्या गावांतील नागरिकांमधून पुढे येत आहे.