पुणे

आळंदी : कोटीतीर्थ खोदकामात आढळले मासे, कासव

अमृता चौगुले

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : आळंदी देवाची येथील कालौघात लुप्त कुंडाचे पुनर्जीवीकरण, संवर्धनाचे काम अविरत श्रमदान आणि गडकिल्ले सेवा संस्था करीत आहे. दरम्यान, कोटीतीर्थ खोदकामात जमिनीखाली जिवंत मासे आणि कासव मिळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आळंदीतील रहिवासी आणि इतिहास अभ्यासक अ‍ॅड. नजीम शेख यांनी आळंदीतील 54 पैकी 22 कुंडांचा शोध घेतला आहे. गेली शेकडो वर्षे हे कुंड विजनवासात गेले होते.

मागील महिन्यात माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी अ‍ॅड. नजीम शेख, गडकिल्ले सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष घुले यांच्याशी भेट झाल्यानंतर गडकिल्ले सेवा संस्था, अविरत श्रमदान-दिघी आणि उदयभाऊ गायकवाड युथ फाउंडेशन या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून आळंदी येथे हेरिटेज वॉक केले. या वेळी शेख यांनी सर्व कुंडांचे ऐतिहासिक महत्त्व, मान्यता विशद केल्या. हेरिटेज वॉकनंतर अविरत श्रमदान आणि गडकिल्ले सेवा संस्थेने ही कुंडे पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार रविवारी कोटीतीर्थावर श्रमदान सुरू केले.

अत्यंत दयनीय अवस्थेत आणि पूर्णतः दुर्लक्षित या कुंडाची आणि परिसराची स्वच्छता करताना संस्थांचे सर्व सदस्य अथक मेहनत घेत होते. कुंडाच्या बाजूने माजलेले गवत, काटेरी झुडपे हटविली गेली आणि कुंड स्वच्छतेस सुरुवात केली असता आश्चर्य घडले. कुंडात प्रचंड दलदल आणि गाळ, तसेच गवत साफ केल्यावर राहिलेला चिखल साफ करण्यासाठी मोहन कदम हे प्रत्यक्ष गाळात उतरले. कमरेपर्यंत गाळात उतरून साफसफाई सुरू असताना बादलीत आलेल्या गाळात चक्क जिवंत मासा बाहेर आला.

त्याला सर्वांनी भक्तिभावे नमन केले. कुंडाची हार, फुले आणि श्रीफळ वाढवून पूजा केली. माउलींचाच आशीर्वाद मिळाला, असे म्हणत पांडुरंग पाटील यांनी आणखी खोदण्यास सुरुवात केली. सहा फूट खोलीवर जिवंत कासव बाहेर आले. जिथे साधा ऑक्सिजनही मिळू शकत नाही, जीव जिवंत राहू शकत नाही अशा बुजलेल्या कुंडात वर्षानुवर्षे ते मासे, कासव कसे आले? याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

गडकिल्ले सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष घुले, रविराज फुगे, जनार्दन घुले, अमोल कोरडे, अविरत श्रमदानचे जितेंद्र माळी, कैलास माळी, सिद्धू औसर, गिरीश आणि नीलम गव्हाळे, रामदास भोसले, ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते. कुंडातील स्वच्छता अभियानात 'अविरत'च्या स्वयंसेवकांसह अभ्यासक डी. डी. फुगे, प्रभाकर कुर्‍हाडे, निसार सय्यद, आळंदी नगरपरिषदेचे काही कर्मचारीही सहभागी झाले होते.

कोटीतीर्थाचे माहात्म्य दत्त संप्रदायाचे अध्वर्यू श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आळंदी पंचक्रोशीत 1876 ते 1878 या कालावधीत पडलेल्या भीषण दुष्काळात तपश्चर्येच्या जोरावर इंद्रायणीतीरावर गंगा आणि कृष्णा नदीचे पाणी प्रकट केले, असे सांगितले जाते. ज्या ठिकाणी पाणी प्रकट झाले, तेथे त्यांनी बांधलेल्या कुंडाला कोटीतीर्थ म्हणून संबोधले. कुंडातील पाण्याने काही दिवस नियमित अंघोळ केली वा शरीर स्वच्छ केले असता सर्व चर्मरोगांपासून सुटका होते, अशी महती सांप्रदायिक ग्रंथात उपलब्ध असल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT