पुणे

भामा आसखेड धरणात मच्छीमाराचा बुडून मृत्यू

अमृता चौगुले

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: भामा आसखेड धरणाच्या जलाशयात मासेमारी करण्यासाठी पाण्यात गेलेल्या शिवे येथील आदिवासी कातकरी समाजाच्या विठ्ठल पांडू मुकणे (वय 48) यांचा मृत्यू झाला आहे. मासेमारी करण्यासाठी मुकणे हे भामा आसखेड धरणाच्या शिवे परिसराच्या जलाशयात रविवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास गेले होते. मच्छीचे जाळे पाण्यात टाकताना त्यांच्याजवळची रबरी ट्यूब हातातून निसटली. ती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मुकणे पोहत ट्यूबच्या मागे जात होते.

जलाशयातील पाण्याचा प्रवाह व हवेचा वेग यामुळे ट्यूब वेगाने पुढे जात होती. शेवटी ट्यूब हाताला न लागल्याने मुकणे माघारी फिरले. परंतु, मागे येताना त्यांची दमछाक झाली आणि ते पाण्यात बुडाले. शिवे गावच्या अनेक ग्रामस्थांनी त्यांचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शोध लागला नाही. शेवटी मावळ तालुक्यातील वन्यजीवरक्षक मावळ संस्था, आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. विठ्ठल मुकणे यांचा या टीमने जलाशयात शोध घेत त्यांचा मृतदेह सोमवारी (दि. 19) दुपारी बाहेर काढला.

जलाशयात उतरून मुकणे यांचा मृतदेह बाहेर काढण्याची कामगिरी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे गणेश निसाळ, नीलेश गराडे, विनय सावंत, निनाद काकडे, सत्यम सावंत, विजय कारले, विकी दौंडकर, साहिल नायर, साहिल लांडगे यांनी केली. अनेक ग्रामस्थांनी देखील प्रयत्न केले. या वेळी शिवे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. चाकण पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

SCROLL FOR NEXT