पुणे

बोरीबेल येथील वनविभाग हद्दीत आग; वनसंपदेचे मोठे नुकसान

अमृता चौगुले

रावणगाव (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : बोरीबेल येथील पठारावर वन विभागाच्या हद्दीत लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रविवारी (दि.1) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही.
बोरीबेल येथील वन विभागाच्या हद्दीतील गट नं. 314 मधील जवळपास दहा एकर क्षेत्र या आगीमध्ये जाऊन खाक झाले. आगीत मोठ्या प्रमाणावर वृक्ष होरळपले असून छोटे वृक्ष जुळून खाक झाले आहेत.

आगीत छोटे-मोठे वनचर मृत्युमुखी पडल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. संध्याकाळी आठ वाजता पठारावर आग लागल्याचे दिसताच सरपंच नंदकिशोर पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाचपुते, शेखर रसाळ, स्वप्निल पाचपुते, उत्तम खळदकर, वनरक्षक निखिल गुंड, वन कर्मचारी शितोळे यांच्यासह उमाजी नाईक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने उशिरा रात्री आग आटोक्यात आली.

दरवर्षी रावणगाव – बोरीबेल पठारावरील वन विभागाच्या हद्दीतील अनेक भागांना रात्रीच्या वेळेस आग लागते. मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान होत असते. आग लावणारे अज्ञात असल्याने वन विभागाकडून गुन्हे दाखल होत नाहीत. वन विभागाच्या हद्दीला लागून शेतकर्‍यांच्या खासगी जमिनी असल्याने त्यातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, याला जबाबदार कोण ?
                                                                   मधुकर पाचपुते,
                                                         ग्रामपंचायत सदस्य बोरीबेल

SCROLL FOR NEXT