कडूस येथील जुन्या वाड्याला आग pudhari
पुणे

कडूस येथील जुन्या वाड्याला आग; धुराचे लोट दूरपर्यंत, आगीचे कारण अस्पष्ट

धुरापाठोपाठ आगीने भीषण रुप धारण केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

पुढारी वृत्तसेवा

कडूस : कडूस (ता. खेड) येथील बाजारपेठेनजिक असणाऱ्या एका भल्या मोठ्या जुन्या वाड्यात आग लागल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले. धुरापाठोपाठ आगीने भीषण रुप धारण केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागण्याची घटना बुधवारी (दि. ९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

कडूस बाजारपेठ नजिक एक जुना पडका वाडा असून या वाड्याच्या चहूबाजूनी मोठमोठ्या भींती आहेत. वाड्याच्या आत मोठ्या प्रमाणात वाळलेल्या गवतासह कचरा असल्याने मोठी आग लागली. भर वस्तीत हा वाडा असून या वाड्याच्या चहूबाजूनी नागरिकांची घरे असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते.

बुधवारी गावचा आठवडे बाजार असल्याने नागरिकांची बाजारपेठत प्रचंड गर्दी होती. भर दुपारी २ आग लागूनही फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. गावाच्या बाहेरून धुर दिसू लागला होता. धुर येत असल्याचे निदर्शनास आले. उन्हात प्रचंड वारा असल्याने धुराच्या लोटापाठोपाठ आगीने भीषण रुप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी घरच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. परंतु ही आग आटोक्यात येत नव्हती.

ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही; मात्र आगीमुळे वाड्यातील पूर्ण गवत, कचरा जळून खाक झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा वाडा भरवस्तीत असल्याने आजूबाजूच्या घरांना व लोकांना या आगीची झळ पोहोचली. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. भरवस्तीतील हा वाडा असल्याने या वाड्यात स्वच्छता ठेवण्याची मागणी वारंवार येथील रहिवाश्यांनी केली आहे.

ही आग नेमकी कशाने लागली आहे, याचे कारण नक्की समजू शकले नसले तरी अज्ञात व्यक्तीने कचरा किंवा गवत पेटवल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT