पुणे/कात्रज: कात्रज भागात इलेक्ट्रिक दुचाकीनिर्मिती करणार्या एका कंपनीत मंगळवारी (दि. 4) दुपारी आग लागली. कंपनीतील साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तासाभरानंतर आग आटोक्यात आणली.
कात्रज-गुजरवाडी रस्त्यावरील साई इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात इलेक्ट्रिक दुचाकीनिर्मिती करणारी कंपनी आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास कंपनीत आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीतील कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. कंपनीतील सााहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. आगीत कंपनीतील वाहनांचे सुटे भाग, बॅटरी तसेच अन्य साहित्य जळाले.150 दुचाकी अर्धवट स्थितीत बनविलेल्या होत्या. त्या जळाल्या आहेत.