पिंपरी : तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 ऑगस्ट 2021 पासून 27 मे 2022 या कालावधीत चिंबळी व भोसरी येथे घडला. याप्रकरणी तरुणाने सोमवारी (दि. 27) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदीप अनंत सरफळे (40, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना चिंबळी येथील प्रवीण इंडस्ट्रीज ही कंपनी विकण्याच कबूल केले. त्यानंतर त्या कंपनीची परस्पर दुसर्याला विक्री केली. फिर्यादी याने आरोपीकडे व्यवहारातील 13 लाख 17 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आरोपीने पैसे देण्यास नकार दिला. फिर्यादी यांनी आरोपीला विनंती केली असता त्याने लोकांसमोर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.