पुणे; पुढारी वृत्तेसवा : ग्रामपंचायतींना आपल्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी वित्त आयोगाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतींना निधी खर्च करता आलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी वित्त आयोगातून जिल्ह्याला 255 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
तो वेळेत खर्च करणे अपेक्षित असून, त्याचा अहवाल शासनाला सादर करावा लागतो. पुणे जिल्ह्यात 1 हजार 385 ग्रामपंचायती असून, त्यांना 15व्या वित्त आयोगातून सुमारे 255 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी त्या निधीच्या माध्यमातून कामाला सुरुवातदेखील केली असली, तरी सुमारे 46 ग्रामपंचायतींनी अद्यापही एका रुपयाचाही खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या ग्रामपंचायतींच्या सुनावण्या घेऊन निधी खर्च करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही.
निधी खर्च न करणार्या ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळावर कडक कारवाई करण्याची तंबी जिल्हा परिषदेने दिले आहे. वित्त आयोगाचा निधी काही तांत्रिक कारणांमुळे 46 पैकी 15 ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत. निधी खर्च न करणार्या ग्रामपंचायतींवर 39 (1) अन्वये कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
निधी कुठे खर्च करता येतो…
पाण्याचा निचरा आणि पाणीसाठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण व कुपोषण रोखणे, जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींचा आठवडे बाजार, मूलभूत वीज, पाणी, कचर्याचे संकलन व विल्हेवाट लावणे, सुका व ओला कचरा व्यवस्थापन करणे, नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावा वेळी मदतकार्य, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल, स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण, एलईडी पथदिवे आणि सौर पथदिव्यांची बांधकाम व दुरुस्ती, ग्रामपंचायतीमध्ये पुरेशी इंटरनेट सेवा, सार्वजनिक वाचनालय, मुलांसाठी उद्याने, मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रीडा व शारीरिक फिटनेस उपकरणांवर खर्च करता येते.
निधी खर्च न करणार्या ग्रामपंचायती
जिल्ह्यातील बारामती, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात प्रत्येकी आठ, खेड सात, भोर पाच, इंदापूर आणि मुळशी प्रत्येकी तीन, वेल्हे दोन, तसेच शिरूर आणि हवेली तालुक्यातील एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे.