पुणे

पुणे : अखेर उजनीवर फ्लेमिंगोे अवतरले ! तब्बल दोन महिने उशीराने आगमन

अमृता चौगुले

प्रवीण नगरे: 

पळसदेव : उजनीचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो हे नजाकतदार परदेशी पक्षी, अखेर उजनी जलाशयात येऊन दाखल झाले. यंदा नेहमीपेक्षा तब्बल दोन महिने उशिराने त्यांचे आगमन झाले असून, त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण संचारले आहे. दोनशेहून अधिक फ्लेमिंगोंनी धरण काठाचे सौंदर्य खुलवले आहे.

युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. पांढरेशुभ— परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखुड वक्राकार केशरी चोच,गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी सध्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव, काळेवाडी, डीकसळ, खानोटा, करमाळा तालुक्यांतील कुगाव, केडगाव गावांच्या शिवारात पसरलेल्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना नजरेस पडत आहेत.

तांबड्या शेवाळामुळे पंखांना लाल रंग
उजनीच्या पाण्यात वाढणारे अटोलिया या तांबड्या शैवाल या पाणवनस्पतीचे सेवन केल्याने करड्या रंगाच्या पिल्लांना तांबडा रंग प्राप्त होतो. धरणातील पाण्यात विपुल प्रमाणात तांबडे शेवाळ वाढते हे धरणाचे वैशिष्ट्य आहे.

उजनीवरील पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदीसाठी मी कित्येक वर्षांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर फिरतो. वर्षभरात अनेकवेळा उजनीला भेट देऊन तेथील पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करतो. स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेत धरण परिसरात येत असतात. यावर्षी ऋतुचक्र अनियमित होऊन रोहित पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. सतत बदलणार्‍या हवामानातही फ्लेमिंगो उजनीवर येऊन दाखल झाल्याने उजनीचे सौंदर्य वाढले आहे.

                            -डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

काय आहेत वैशिष्ट्ये ?
सुमारे पाच ते साडेपाच फूट उंचीचे पांढरेशुभ— परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड व वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान ही फ्लेमिंगोंची वैशिष्ट्ये आहेत. या पक्ष्यांच्या पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो व ते आकाशात झेप घेतल्यानंतर गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात. या कारणामुळे या पक्ष्यांना अग्निपंख या नावाने संबोधतात. ज्या वेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभे असतात तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात. या कारणामुळे त्यांना रोहित पक्षी या नावाने ओळखतात.
रोहित पक्षी काय खातो ?
मासे, खेकडे, गोगलगाय, शंख, शिंपले इत्यादी मृदुकाय प्राणी, बेडूक व चिखलातील विविध कृमी-कीटक हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून, ते पाणवनस्पती व शेवाळावरही ताव मारतात.

यंदा आगमन उशिरा का ?
यंदा परतीच्या अतिवृष्टीमुळे धरण काठोकाठ भरले होते; शिवाय धरण लाभक्षेत्रातील भूजल पातळीही समाधानकारक होती. परिणामी, धरणातील पाण्याचा विसर्ग लांबणीवर पडून धरण पावसाळ्यानंतर दोन महिने तुडुंब भरून होते. परिणामी, या पक्ष्यांना खाद्यान्न उपलब्ध होत नव्हते. या कारणामुळे या पक्ष्यांनी प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकले. गेल्या महिन्यात भीमा नदीतून व कालव्याद्वारे सिंचनासाठी केलेल्या पाण्याच्या विसर्गानंतर जलाशयाचा काठ उघडा पडून तेथे दलदल निर्माण झाल्याने फ्लेमिंगो आपल्या उदरनिर्वाहासाठी सरसावले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT