पुणे: जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या प्रभागरचनांच्या प्रारूप आराखड्यांवरील हरकती व सूचनांची सुनावणी पूर्ण होऊन, आवश्यक त्या दुरुस्त्या करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची छाननी करून तो अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे. अंतिम प्रभागरचना 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे. या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण 418 हरकती व सूचना आल्या होत्या. त्यापैकी नगरपरिषदासंदर्भात 282 आणि नगरपंचायती संदर्भात 136 हरकती व सूचना आल्या होत्या, त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3 व 4 सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेतली. संबंधितांचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रभागरचना सुधारित करण्यात आली. (Latest Pune News)
प्रारूप प्रभागरचनेत नैसर्गिक हद्द विचारात घेतली नसल्याच्या, नदी-नाल्याच्या पलीकडे प्रभाग तयार केल्याच्या, वस्ती एकसंध न ठेवल्याच्या अशा विविध हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. नगरपरिषदांसाठी 9 ते 11 सप्टेंबर आणि नगरपंचायतींसाठी 9 ते 15 सप्टेंबरदरम्यान प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठविणे अपेक्षित होते. त्यानुसार सुधारित प्रभागरचना आता नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
विभागाकडून या रचनेची छाननी करून हा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या विभागीय आयुक्तांकडेअंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतरच अंतिम मोहोर उमटणार आहे. या अंतिम प्रभागरचनेची प्रसिद्धी गॅझेटद्वारे 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.