पुणे

पुणे : विकासाच्या मुद्द्यावर लढा ; अजित पवार यांची बैठकीत सूचना

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'सहानुभूतीवर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवायची आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे, हे मतदारांना सांगा,' अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना केली.  राष्ट्रवादी काँग्रेसने कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पवार बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'या निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करणा-या असल्याने, दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, हे लक्षात ठेवून सर्वांनी गांभीर्याने प्रचार करावा. कसबा पेठेतील कार्यकर्त्यांनी मतदारसंघातच थांबून प्रचार करावा, तर शहरातील अन्य सात मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साह्य करावे. शिवसेनेचे सचिन अहिर हे शुक्रवारी मेळावा घेणार आहेत. मी रविवारी तिन्ही पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे.' ते म्हणाले, 'विधान परिषद निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा कल कळाला.

अमरावती मतदारसंघात भाजप भक्कम असतानाही, तेथे काँग्रेस जिंकली. शिवसेनेने समंजस भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढल्यास, त्या आपण जिंकू शकतो. जे विधान परिषदेत घडले, तसेच विधानसभेच्या या दोन्ही जागा आपण जिंकल्यास, राज्यात त्याचा मोठा संदेश जाईल. कसबा पेठेत यापूर्वी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वसंततात्या थोरात जिंकले होते.एकजुटीने काम केल्यास आपला उमेदवार जिंकू शकतो. या निकालामुळे कोणाच्याही महापालिकेच्या निवडणुकीत अडचणी येणार नाहीत.' अंकुश काकडे, दीपक मानकर, प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, गणेश नलावडे, शिल्पा भोसले आदींची भाषणे झाली. प्रदीप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

मविआसोबत वंचित आल्यास अधिक चांगले
'शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडी आली आहे. वंचित विकास आघाडी ही महाविकास आघाडीसोबत आली, तर अधिक चांगले होईल,' असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यासंदर्भात शिवसेनेशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत मतविभागणी टाळण्याचा सल्ला पवार यांनी दिला.

अजित पवारांसारखे नव्हे, साहेबांसारखे बोला
'कोणी मतदार मत देत नाही म्हणाला, तर 'जा तुम्हाला काय करायचे ते करा,' असे तुम्ही त्याला म्हणू नका. त्याचे म्हणणे समजून घेत त्याला तुम्हीही आपले म्हणणे सांगा,' असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. 'अजित पवारांसारखे बोलू नका. पवारसाहेबांसारखे बोला. साहेब सांगतात तसे त्या मतदाराला समजावून सांगा,' असे अजित पवार यांनी सांगताच कार्यकर्त्यांमध्ये हाश्याचा कल्लोळ झाला.

SCROLL FOR NEXT