पुणे

अंजीर उत्पादनाला बसणार फटका

अमृता चौगुले

खोर : खोर (ता. दौंड) परिसरातील अंजीरबागेला जनाई-शिरसाई व पुरंदर योजनेचे पाणी सुटले नाही, तर कोट्यवधी रुपयांच्या अंजीर उत्पादनाला फटका बसणार आहे. त्यामुळे जनाई-शिरसाई व पुरंदर योजनेचे पाणी आता खोर परिसराला मिळणे गरजेचे झाले आहे.
दौंड तालुक्यातील अंजिराचे उत्पादन घेणारे खोर हे गाव आहे. या गावामध्ये चार महिने अंजिराचा खट्टा बहार व चार महिने अंजिराचा मिठा बहार पार पाडला जात असतो. ऑक्टोबरपासून अंजिराच्या खट्टा बहाराला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पाण्याची पातळी खालावली गेली असून, परिसरात ओढे, तलाव, विहिरी आटल्याने परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे.

या भागातील शेतकरीवर्गाने जनाई-शिरसाई सिंचन योजनेतून फरतडेवस्ती तलावात व पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. हे आवर्तन सोडले गेले तर अंजीरबागेचा या वर्षीचा चालू बहाराला गेलेला खट्टा बहाराचा हंगाम वाया जाणार नाही. मात्र, पाणी जर वेळेत सुटले गेले नाही, तर शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून जगविलेल्या बागा शेतकर्‍यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होतील, असे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे खोरच्या भागात या दोन्ही सिंचन योजनेतून पाणी सोडून तलाव भरून देण्याची मागणी अंजीर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

खोर परिसरात जवळपास 500 एकरावर अंजीरबागा आहेत. अंजीर हेच उपजीविकेचे साधन असून, या भागात अंजिराचे वर्षातून दोन बहार घेतले जातात. शेतकरी अंजिराचे भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक सुबत्ता आल्याने समाधानी असतात. मात्र, पाण्याची वेळीच साथ मिळाली नाही, तर लाखो रुपये खर्चून जगविलेल्या बागा कोलमडतील.
                                                       माऊली डोंबे, शेतकरी, खोर

व्यापारीवर्ग अंजीर घेण्यासाठी गावामध्ये दाखल झाले आहेत. हा माल घेऊन व्यापारी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नांदेड, मालेगाव (नाशिक) अशा विविध ठिकाणी त्याचे मार्केटिंग करतात. अंजिरापासून बनविलेले जाम, जेली, ड्रायफ—ुट्स असे अनेक नावीन्यपूर्ण पदार्थ हे राज्यातील विविध मॉलमध्ये विक्रीस जात आहेत. शेतकरीवर्ग वर्षाला 500 एकरामध्ये जवळपास 15 ते 18 कोटी रुपयांपर्यंत उत्पादन घेत असतो. मात्र, याला पाण्याची देखील साथ तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
                                                           जालिंदर डोंबे, शेतकरी, खोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT