पुणे

पन्नास हेक्टरवरील फळबागा, पिकांचे नुकसान; अवकाळी पावसाने धुमाकूळ

Laxman Dhenge

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: लागोपाठ दोन आठवडे पडलेल्या जोरदार अवकाळी पावसाने पश्चिम हवेली, सिंहगड भागासह हवेली तालुक्यातील 50 हेक्टर क्षेत्रातील उभ्या फळबागांसह भाजीपाला, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळत असताना वादळी पावसाने पिके भुईसपाट केली, तर हातातोंडाशी आलेल्या आंबा, केळी, डाळिंब अशा फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आंबा, पेरू, केळी आदी फळबागा, उन्हाळी पिके, भाजीपाला जमीनदोस्त झाल्याने खडकवासला धरण भागातील मांडवी, कुडजे, सांगरुण, जांभली, सोनापूर तसेच किरकटवाडी, गोर्‍हे बुद्रुक, खानापूर, सिंहगड भागासह पूर्व हवेलीतील शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. असे असले तरी कुठल्याही राजकीय पक्षाला शेतकर्‍यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही, असे गंभीर चित्र पुढे आले आहे.

मणेरवाडी, खानापूर, मोगरवाडी, कल्याण, आर्वी, खामगाव, मावळ, डोणजे आदी ठिकाणी शेतकर्‍यांच्या आंब्याच्या बागा दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने जमीनदोस्त झाल्या. आंबा फळांचे मोठे नुकसान झाले. शेतात अक्षरश: आंब्यांचा खच पडला आहे.
याबाबत हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले की, वादळी पावसाने हवेली तालुक्यात जवळपास 40 ते 50 हेक्टर क्षेत्रातील फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवार (दि. 21) पासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक व इतर कर्मचारी नियुक्त केले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यावर नेमकी हानी किती झाली, याची माहिती मिळेल. याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

दरम्यान, खानापूरचे (ता. हवेली) माजी सरपंच शरद जावळकर म्हणाले की, कच्चा आंबा असल्याने तो मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हवेली तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष नवनाथ तागुंदे व खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर यांनी केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT