पुणे

रात्रीच्या ड्रोन टेहळणीमुळे भीती ; उजनी परिसरात फळबाग शेतकरी चिंतातुर

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपासून रात्री सात ते अकरा या कालावधीमध्ये उजनी धरण 'बॅक वॉटर' परिसरात घिरट्या घालणार्‍या ड्रोनमुळे दहशत पसरली आहे. गावागावांतील फळबागायतदारांसह शेतकरी, ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत. ड्रोनच्या साहाय्याने चोरटे घराची, पिकांची, फळबागांची रेकी करीत असल्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ड्रोनच्या भीतीमुळे शेतात राहणार्‍या शेतकर्‍यांसह गावातील तरुण रात्ररात्र अक्षरशः जागून काढत आहेत.

उजनीकाठच्या वरकुटे बुद्रुक, करेवाडी, अगोती नं. 1 व 2, चितळकरवाडी आदी गावांत ड्रोनची दोन दिवसांपासून टेहळणी सुरू आहे. या ड्रोन टेहाळणीमुळे उजनी परिसरात शेतकरी, ग्रामस्थांना चिंतेने ग्रासले आहे. ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात जगत आहेत. सध्या टोमॅटो, डाळिंब या पिकांना सोन्यासारखा दर मिळत आहे. रात्रीतून पीक चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून पिकांच्या चोरी होण्याच्या घटनेने शेतकरी रात्र जागून काढत आहेत.

उजनी परिसरात मागील चार महिन्यांपासून अगोदरच भुरट्या चोरांचा सुळसुळाट आहे. या भुरट्या चोर्‍यांनी त्रस्त झालेले नागरिक व शेतकरी या ड्रोनच्या टेहळणीने घाबरलेले आहेत. उजनी काठावर काही शेतकरी कुटुंबे स्वतःच्या सोयीनुसार शेतांमध्ये वस्ती करून राहत आहेत. एकटी वस्ती व परिसरात सोबतीला जवळ कोण नसल्यामुळे या ड्रोनमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

दोन दिवसांपासून वरकुटे बुद्रुक गावातील तरुण व ग्राम सुरक्षा दलाचे युवक दुचाकीवरून ड्रोनचा पाठलाग करत आहेत. अजून तरी ड्रोन किंवा त्याचा चालक सापडला नाही. परिसरात अद्याप अनुचित घटना घडली नाही. मात्र, परिसरात सतत ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या टेहळणी करणार्‍या ड्रोनचा लवकर छडा लावावा, अशी मागणी सुरेश शिंदे व विनोद दळवी यांच्यासह परिसरातून होत आहे.

आमच्या स्तरावर कोणताही प्रशासकीय सर्व्हे सुरू नसून, वरिष्ठ कार्यालयाकडून काही सर्व्हे सुरू असल्यास माहिती घेतो.
                                                          – श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापूर

या फिरत्या ड्रोनबाबत माहिती मिळाली असून, पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. रात्री स्वतः पोलिस यंत्रणा तैनात करून या प्रकरणाचा छडा लावणार आहे.
                                             – दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, इंदापूर

SCROLL FOR NEXT