सोनवणेंच्या खुनामुळे दिव्यांगांच्या मनात भीती File Photo
पुणे

Manchar Crime: सोनवणेंच्या खुनामुळे दिव्यांगांच्या मनात भीती

आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग संघटनांकडून निषेध

पुढारी वृत्तसेवा

मंचर: पानटपरी व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या मंचर (ता. आंबेगाव) येथील दिव्यांग गणेश सोनवणे यांचा खून झाल्याच्या घटनेने आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंचर येथे घडलेल्या घटनेतून दिव्यांग व्यक्ती सुरक्षित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप दिव्यांग संघटनांनी केला आहे.

गणेश सोनवणे यांच्याप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती टपरी व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सोनवणे यांच्या खुनाच्या घटनेने आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती असुरक्षित असल्याची तीव्र प्रतिक्रिया आंबेगाव तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांच्या संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Pune News)

दिव्यांग व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाने कायदा केला आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये वावरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत. समाजातील इतर घटकांप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनाही सुरक्षित वातावरणामध्ये वावरता यावे, यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. मंचर येथे घडलेल्या घटनेतून दिव्यांग व्यक्ती सुरक्षित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे दिव्यांग संघटना आंबेगाव तालुका यांच्या वतीने सांगण्यात आले.

गणेश सोनवणे यांच्या खुनातील आरोपींना अटक केली असली, तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी; अन्यथा आंबेगाव तालुक्यात उग्र आंदोलन करण्यात येईल. गृहमंत्री, जिल्हा पोलिस मुख्यालयाला तक्रारी देण्यात येतील. या घटनेचा दिव्यांग संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
- समीर टाव्हरे, अध्यक्ष, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, आंबेगाव तालुका
समाजामध्ये दिव्यांग घटक समाजातील शेवटचा घटक मानला जातो. जर हाच असुरक्षित नसेल, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
- सुनील दरेकर, उपाध्यक्ष, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, आंबेगाव तालुका
मंचर शहरामध्ये दिव्यांग व्यक्तीचा निर्घृण खून झाला, ही दुर्दैवी बाब आहे. दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी.
- ज्ञानेश्वर शिंदे, सचिव, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, आंबेगाव तालुका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT