पुणे

लोणी धामणी : भय इथले संपत नाही; बिबट्यांच्या वाढत्या वावराने शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे पाळीव प्राण्यांसह माणसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या प्रवणक्षेत्रातील गावे सायंकाळी सहाच्या पुढे अक्षरशः बंद असल्यासारखे पाहावयास मिळत आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील विशेषत: जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यांमध्ये बिबट्याकडून शेतकर्‍यांचे पशुधन तसेच मानवावर हल्ले वाढत आहेत.

आंबेगाव तालुक्यात 1 एप्रिल 2022 ते आजअखेर 348 पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. सात माणसांनाही जखमी केले. कित्येक पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यांची नागरिकांनी नोंदच केलेली नाही. चारही तालुक्यांत बहुतांश गावांमध्ये शेतीसाठी पाण्याची मुबलकता असल्याने शेतकरीवर्ग ऊस या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहे. बिबट्याने उसालाच आपले रहिवास मानल्याने बिबट्या ऊस असणा-या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर, खडकवाडी गावांत या पाण्याची उपलब्ध नसणा-या क्षेत्रातही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने हल्ले होताना दिसून येत आहेत. सर्व परिसरात बिबट्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. परिसरात दिवसादेखील बिबट्याचे दर्शन शेतक-यांना होत असून, शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चोरट्यांचाही उच्छाद वाढला
सध्या या भागात चो-यांचे प्रमाण वाढल्याने रात्री घरात झोपताना चोरट्यांची भीती, तर दिवसा बिबट्याची दहशत यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. शासनाने चोरट्या व बिबट्यांकडे लक्ष देऊन त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT