पुणे

पुणे : मतदानासाठी संस्थाचालकांचा फतवा; ठराविक सदस्यांनाच मतदान करण्याचे शिक्षकांना आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. परंतु या अधिसभेत ठराविक सदस्यांनाच मतदान करावे असा फतवा अनेक संस्थाचालकांनी काढला आहे. त्यामुळे विविध संस्थांमध्ये काम करत असलेल्या शिक्षक तसेच पदवीधर संघासाठी मतदान करण्यास पात्र असलेल्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील 71 मतदान केंद्रावर विद्यापीठाच्या अधिसभेसाठी मतदान होणार आहे. विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल अशा प्रमुख दोन पॅनेलमधील उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. विद्यापीठ विकास मंच हा भारतीय जनता पक्षाशी जवळीक असणारा तर सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल हा महाविकास आघाडीशी जवळीक साधणारे पॅनेल आहेत.

10 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत 37 उमेदवार उभे आहेत. दोन्ही पॅनेलशी जवळीक साधणार्‍या संस्थाचालकांच्या शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही शिक्षकांनी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीला फोनव्दारे दिलेल्या माहितीनुसार, संस्थाचालकांनी येत्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांचा उमेदवार क्रमांक देखील सांगितला आहे.

त्यामुळे त्यांनाच मतदान करण्याचा दबाव येत आहे. संस्थेत काम करत असलो तरी मतदार म्हणून आम्हाला आमचे मत आहे. त्यामुळे मत कोणाला द्यायचे याचा आम्हाला अधिकार हवा. परंतु संबंधित उमेदवाराला मत दिले नाही तर संस्थेत काम करत असताना विविध अडचणी निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे संभ—मावस्थेत असल्याची माहिती संबंधित मतदार शिक्षकांनी दिली आहे. त्यामुळे मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT