पुणे

मोरगाव : शेतकर्‍यांची विमानातून तिरुपती यात्रा; पिकअपमधून विमानतळावर

अमृता चौगुले

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा : बारामतीच्या जिराईत बाबुर्डी गावातील 34 शेतकर्‍यांनी विमान प्रवासाची इच्छा नुकतीच पूर्ण केली. विमानतळावर जाण्यासाठी दोन पिकअपमधून हे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचल्याने इतर प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. बाबुर्डीच्या 34 शेतकर्‍यांनी बालाजीला विमानाने जायचे, असा निर्णय घेतला.

विमान प्रवासाच्या कागदपत्रांची पूर्तता केली व विमानतळावर जाण्यासाठी त्यांनी दोन पिकअप करून विमानतळावर गेले, ही बाब सर्वांना कौतुकास्पद वाटली, असे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी सांगितले. पोमणे यांच्यासह पोलीस पाटील राजकुमार लव्हे, नितीन लव्हे, दिलीप लव्हे, सोनबा लव्हे, छबन लव्हे, हनुमंत गायकवाड आदींसह 34 जणांचा या प्रवाशांमध्ये सहभाग होता.

पिकअपमधून शेतकर्‍यांचा विमानतळावर उतरतानाचा व्हिडिओ तेथील अन्य प्रवाशांनीही काढला. विमान प्रवासाला प्रत्येकी सहा ते साडेसहा हजार रुपये खर्च आला. प्रत्येकाने आपला प्रवास खर्च स्वतः केला. प्रवाशांमध्ये महिला व वृद्धांचाही समावेश होता. पहिल्याच विमान प्रवासात ते हरवून गेले होते. आकाशातून पृथ्वीचे दिसणारे विहंगम दृश्य पाहून अनेकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. तीन दिवसांच्या या सहलीत दररोज शेतात काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍यांनी देवदर्शनासोबत पर्यटनाचाही आनंद घेतला.

आयुष्यात एकदातरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा होती. आमची विमान प्रवासाची हौस पूर्ण झाल्याने समाधान वाटले.

                                     जाईबाई लव्हे, वृद्ध महिला शेतकरी.

SCROLL FOR NEXT