मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक किलो कांद्याला प्रतिकिलो प्रतवारीनुसार 15 ते 25 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. कांद्याची सड होत असल्याने शेतकर्यांनी बाजारभाव समाधानकारक नसतानाही बराकीत साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढला आहे. संततधार पावसामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांना कांद्याच्या बाजारभाववाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, थोड्याच दिवसांत कांद्याचे बाजारभाव वाढतील, असा अंदाज शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहेत.
आंबेगाव तालुक्यात दरवर्षी जून, जुलै महिन्यात कांदा लागवड होते व नोव्हेंबर महिन्यात नवीन कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत येत असतो. त्यामुळे दिवाळीत कांद्याचे बाजारभाव प्रतिकिलो पाच ते सहा रुपये इतका असतो. परंतु, चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याने शेतकर्यांना पावसाळी कांदा लागवड करता आली नसल्याने मागील वर्षांत उन्हाळी कांदा शेतकर्यांनी कांदाचाळीतच साठवून ठेवला होता.
चालू वर्षी अद्याप नवीन कांदा लागवड नसल्याने कांद्याचे बाजारभाव वाढतील, असा अंदाज शेतकर्यांना आहे. सततच्या पावसामुळे व कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत असल्याने ज्या शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला, त्या कांद्याची सड मोठ्या प्रमाणात होत आहे, अशी माहिती अवसरी बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी श्रीकांत गवारी, अजय गवारी, दत्तात्रय गवारी, पांडू हिंगे यांनी दिली. परिणामी, राहिलेला कांदा विक्रीसाठी काढण्यात येत आहे.