वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी हवालदिल File Photo
पुणे

वाढत्या उष्णतेमुळे शेतकरी हवालदिल

राज्यात उष्णतेची लाट सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

परिंचे: राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, वाढत्या उष्णतेमुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. परंतु, गेल्या चार दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे शेतकर्‍यांना आपली पिके जगवणे अवघड होऊन बसले आहे.

ग्रामीण भागामध्ये सकाळी दहापासून ते दुपारी चारपर्यंत उष्णतेने कहर केला आहे त्यातच जिवाचे रान करून शेतकरी आपली पिके जगवित आहेत. गेल्या वर्षी या भागांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले होते, त्यामुळे त्यांनी भरउन्हाळ्यातही इतर पिकांबरोबर तरकारी पिके मोठ्या प्रमाणात लागवड केली आहेत. मात्र, उष्णतेची लाट आणि बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे.

पुरंदर तालुक्यात वीर, तोंडल, हरणी, परिंचे, यादववाडी, हरगुडे, पांगारे या गावांमध्ये टोमॅटो, कांदा, मिरची अशा अनेक तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात केला आहे. परंतु, गेल्या आठवड्यापासून कांदा, टोमॅटो तसेच तरकारी पिकांचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पशुधन जगविण्यासाठी बळीराजाची धडपड

सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे शेतकर्‍याला आपले पशुधनही जगवणे जिकरीचे ठरणार आहे. कारण वाढत्या उष्णतेमुळे दुभत्या गाई, म्हशींना वेगवेगळ्या आजारांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे पशुधनाकडे ही शेतकर्‍याला लक्ष द्यावे लागणार आहे.

वीर आणि पंचक्रोशीत कांदा आणि टोमॅटो मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, मातीमोल बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. तसेच वाढती महागाई, मजुरांच्या तुटवड्यामुळे शेती तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या निवडक पिकांना हमीभाव देऊन शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण आखावे.
- अरुण दत्तात्रेय धुमाळ, प्रगतशील शेतकरी, वीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT