निमोणे: चिंचणी (ता.शिरूर) येथील घोड धरणातून राबवण्यात येणार्या साकळाई उपसा सिंचन योजनेला शिरूर तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. ही योजना रद्द करावी अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पूर्व भागातील शेतकर्यांनी दिला आहे.
चिंचणी (ता. शिरूर) येथे नुकतीच या नव्या प्रस्तावित योजनेच्या विरोधात शेतकर्यांची बैठक पार पडली. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. चिंचणी येथील घोड धरणातून साकळाई योजना ही अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गावांसाठी प्रस्तावित आहे. याबाबत नुकताच शासकीय आदेश काढण्यात आला होता. मात्र, या योजनेला शिरूर तालुक्यातील शेतकर्यांनी मोठा विरोध केला आहे.
चिंचणी येथील घोड धरणावर डावा कालवा असून, त्यावर श्रीगोंदा तालुक्यातील 17 गावे, कर्जतमधील 12 गावे अवलंबून आहे, तर उजवा कालव्यावर शिरूर तालुक्यातील 14 गावे अवलंबून आहेत. या नव्या प्रस्तावित योजनेमुळे शेतकर्यांवर मोठा अन्याय होणार आहे. पूर्व भागातील अनेक गावांना सातत्याने पाणीटंचाईस सामोरे जावे लागते.
तसेच घोड धरणावर रांजणगाव औद्योगिक वसाहत यालाही पाणीपुरवठा केला जातो. तसेच नव्याने पाणीपुरवठा योजनादेखील प्रस्तावित आहे. दर उन्हाळ्यात घोड धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने शेतकर्यांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यात काटकसर करून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा होतो. नव्या साकळाई योजनेमुळे नेमका कोणाचा फायदा होणार आहे, असा सवालही काही शेतकर्यांनी केला आहे.
या बैठकीला निमोणे, गुणाट, शिंदोडी, पिंपळसूटी, शिरसगाव काटा, इनामगाव आदी गावातील ग्रामस्थांसह श्रीनिवास घाडगे, बाळासाहेब घाडगे, राकेश पाचपुते, एकनाथ वाळुंज, योगेश ओव्हाळ, शहाजी गायकवाड, अनिल पवार, शामराव पवार, दादासाहेब पवार, संतोष लगड, आबासाहेब काळे, संदीप नवले, शुभम नवले, संतोष काळे आदी उपस्थित होते.
...तर न्यायालयात याचिका दाखल करणार
या भागात घोड उजवा कालवा असला, तरी त्या कालव्यालाच पुरेसे पाणी मिळत नाही. या भागात सातत्याने सिंचनासाठी शेतकर्याची ओरड असते. मात्र, तरीही याच घोड धरणावरून साखळी उपसा सिंचन योजनेचा अट्टाहास केला जात असल्याने ही योजना रद्द करण्याची मागणी शेतकर्यांनी बैठकीत केली. तसेच ही योजना रद्द केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल तसेच तरीही त्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना केली गेली नाही तर प्रसंगी कोर्टात या विरोधात याचिका दाखल करण्याचा आमचा विचार असल्याचा ग्रामस्थांनी सांगितले.