ओतूर: उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील मढ बारागाव परिसरात अचानक अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या अवकाळी धुवाधार पावसाने व गारपिटीने रविवारी (दि. १३) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सर्वच शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने या भागातील शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे.
शेतात काढून ठेवलेला कांदा अवकाळी झालेल्या पावसाने व गारपिटीने पूर्णपणे पाण्यात तरंगत असून तो नष्ट झाला आहे. सोबतच मिरची, टोमॅटो, बाजरी, आंबा, द्राक्ष आदी पिकांचे पूर्ण नुकसान झाल्याने या भागातील शेतकरी हतबल झाला असून येथील शेतकऱ्यांची शेती व्यवसायात तब्बल दहा वर्षे आर्थिक पिछेहाट झाल्याचे बोलले जात आहे, नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मढचे माजी सरपंच महेंद्र सदाकाळ यांनी केली आहे.
रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले, सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला, मोठ्या थेंबाचा पाऊस आणि गारांचा खच यामुळे सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. पावसाने इतका कहर केला की २४ तास उलटून गेले तरी सर्वच शेतांमधील गुडघाभर साठलेले पाणी ओसरायला तयार नव्हते.
त्याशिवाय आंबा झाडाच्या कैऱ्यांचा खच झाडाखाली पडल्याने आंबापिकांचे नुकसान झाले आहे, कल्याण-नगर महामार्गावर वाटखळे गावच्या हद्दीत वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली असून काही घरांवरील पत्रेही वादळी वाऱ्याने उडून गेल्याचे वृत्त हाती आले आहे.
आजही अवकाळी पावसाची टांगती तलवार पुणे जिल्ह्याच्या उत्तरेतील गावांवर असून शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाची अन् गारपिटीची मोठी धास्ती घेतली आहे.ओतूर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा काढणीचे काम वेगात सुरू आहे. अवकाळी पाऊस होण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग कालच्या पावसाने सतर्क झाला आहे.