पुणे

पुणे : न्हावरेतील शेतकर्‍यांचे आंदोलन ; चासकमान कालव्याचे पाणी न मिळाल्याने संताप

अमृता चौगुले

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील चासकमान डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या टेलच्या लाभक्षेत्रात पाणी न पोहोचल्याने न्हावरे परिसरातील शेतकर्‍यांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करून आंदोलन केले. चासकमान धरण 100 टक्के भरल्याने कालव्यातून काही दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. परंतु अद्याप हे पाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या न्हावरे, उरळगाव, आंबळे निमोणे, चव्हाणवाडी, गुनाट, निर्वी, आंधळगाव, आलेगाव, कोळगाव, कोकडेवाडी आदी लाभक्षेत्रातील गावात पोहोचलेच नाही. त्यामुळे येथील सर्वपक्षीय शेतकर्‍यांनी प्रशासनाच्या या कारभाराबाबत न्हावरे (ता. शिरूर) येथे निषेध सभेचे आयोजन करून आंदोलन केले.

पाणी सोडण्याचा नियम टेल -टू -हेड असताना संबंधित प्रशासन नाहक शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील टेलच्या भागावर अन्याय करून पाणी हेडला प्रथम देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याप्रसंगी चासकमानचे उपकार्यकारी अधिकारी अभिमन्यू मासाळ यांना निवेदनदेखील देण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे युवा नेते राजेंद्र कोरेकर, भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुभाष कांडगे, माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच जयवंतराव कोकडे, अरुण तांबे, निमोणेचे माजी सरपंच विजय भोस, अ‍ॅड. डी. डी. शिंदे, दिनेश दरेकर, संतोष काळे, ज्ञानेश्वर बहिरट, गोरक्ष तांबे, शिवाजी घोलप, सागर खंडागळे, सुरेश कोरेकर, नितीन खंडागळे, बिरदेव शेंडगे, अनंत काळे, बापूसाहेब काळे, नागेश निंबाळकर, पोपटराव शेलार, संभाजी कांडगे, संदीप खंडागळे, गोरख पवार, चंद्रकांत आनंदे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत न्हावरे परिसरातील शेतीसाठी पाणी येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अधिकारी अभिमन्यू मासाळ यांनी संतप्त शेतकर्‍यांना सांगितल्याने आंदोलक शेतकरी शांत झाले.

पिके जळण्याच्या मार्गावर
न्हावरे परिसरात पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आली आहेत. गेल्या महिन्यापासून चासकमान धरणातून पाणी सोडले असूनही अद्याप ते न्हावरे परिसरात न आल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT