नारायणगाव: सध्या भाजीपाल्याची आवक घटली असली तरी बाजार पडल्याचे पहायला मिळत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारामध्ये फ्लॉवर, कोबी, वांगी, चवळी तसेच घेवडा, फरशी अवघी 5 रुपये किलोने विक्री होत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. रोगट व दूषित हवामानामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्चदेखील वाढला आहे. कोथिंबीर व मेथी जुडीला दहा ते बारा रुपयाला विक्री होत आहे. अनेक शेतकर्यांनी कोथिंबीर व मेथी शेतातून काढणे सोडून दिले आहे. तर काही शेतकर्यांनी या पिकामध्ये मेंढरं सोडली आहेत.
हिरवी मिरची, पापडी, वटाणे, चवळी, तोंडली, दोडका, दुधी भोपळा, काळी वांगी, लिंबू, फ्लॉवर, कोबी, काकडी, घेवडा, मका या सगळ्यांचे बाजारभाव पडले आहेत. फक्त शेवगा आणि गवारीला चांगला बाजारभाव मिळत आहेत. शेवगा 70 ते 100 रुपये किलो व गवार 80 ते 90 रुपये किलो दराने विक्री होत आहे. टोमॅटोचे देखील दर सध्या पडले आहेत. 22 किलोचे क्रेट अवघे 200 रुपयांना विक्री होत आहे. फक्त गावठी टोमॅटोला 400 रुपयांप्रमाणे क्रेट विक्री होत आहे.
सध्याच्या रोगट हवामानाचा या पिकाला देखील फटका बसत आहे. त्यातच बीड, संगमनेर, पारनेर या भागातून टोमॅटो विक्रीला येत असल्यामुळे आवक वाढली आहे. तसेच इतर राज्यात देखील टोमॅटो सुरू झाल्याने टोमॅटोचे बाजारभाव पडले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. साधारण एक महिना टोमॅटोचे बाजारभाव असेच राहतील असे बोलले जात आहे.
नारायणगाव उपबाजारात दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत तरकारी भाजीपाल्याची विक्री होत असते. तर सकाळी 9 ते 11 वाजता टोमॅटोचा लिलाव होतो आणि सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोथंबीर, शेपू, मेथी, कांद्याची पात यांचा लिलाव होत असतो. गेल्या 15 दिवसांपासून केळी व ऊस आणि द्राक्ष वगळून कोणत्याच पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.
महागडी कीटकनाशके, खते वापरून भाजीपाला चांगला पिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे भांडवली खर्च देखील निघत नाही, अशी खंत कैलासनगर येथील शेतकरी चंद्रकांत हांडे यांनी व्यक्त केली.