कळस: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शेतकर्यांच्या कर्जमाफीचा शब्द खरा ठरणार का? याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचे डोळे लागले आहेत. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफी ही होणार अशी शेतकर्यांना आशा वाटू लागू लागली आहे
राज्य विधीमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये शेतकर्यांना कर्जमाफीची आशा लागली आहे. वाढलेल्या कीटकनाशके खतांच्या किमती, इंधन, मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शेतमालाला मिळणारा भाव व उत्पादन खर्च याचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. एकीकडे आधुनिक भांडवली शेती करण्याच्या
नादात शेतकरी खर्च करत आहेत तर दुसरीकडे शेती विषयक लागणार्या साधनसामग्रीवर लादलेला जीएसटी कर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने कोणतीही अट न घालता चालू व थकित कर्जमाफी करावी असे शेतकरी सांगत आहेत.
कारण मागील सरकारच्या काळामध्ये पूर्वीपासून कर्ज भरत आलेला शेतकरी हा तसाच राहिला होता. त्या सरकारने नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु, मोजक्या शेतकर्यांना त्याचा लाभ झाला होता. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरू लागले आहे.
प्रत्येक शेतमालाला हमीभाव द्यावा
शेतकर्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमीभाव सरकारने द्यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. फळबागा भाजीपाला याच्यासाठी लागणारा भरमसाठ खर्च शेतकर्यांना करावा लागत आहे. परंतु बाजार भाव गडगडल्यानंतर त्याचा भांडवली खर्च देखील निघत नाही. परिणामी शेतकर्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे.
शेतकर्यांच्या मनामध्ये शेतीविषयक नकारात्मकता व उदासीनता तयार झाली आहे. सरकारकडून शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी तरच शेतकरी वर्ग टिकेल.-विजय गावडे, शेतकरी, कळस.