पुणे

शेतकर्‍यांना शिवतारेंकडून अपेक्षा; कायम दुष्काळी भागातील जनतेची पाण्यासाठी आर्त हाक

अमृता चौगुले

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : तथाकथित 'बारामती विकास मॉडेल'चा देशभर गवगवा पवारांकडून केला जात असला, तरी याच बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांनी पवारांचेच कट्टर राजकीय विरोधक असलेल्या माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना शेतीला पाणी मिळण्यासाठी आर्त हाक दिली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात बारामतीच्या विकासाची चर्चा पध्दतशीरपणे पसरवली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती म्हणून ओळखली जाते. बारामती शहर व आसपासचा विकास पाहिला तर कोणाला शंकादेखील येणार नाही की याच बारामतीच्या सुपे परिसर आजही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. याचा प्रत्यय माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या बारामतीमधील गावभेटदरम्यान आला.

शिवतारे यांनी बारामती तालुक्यातील कायम दुष्काळी असणार्‍या काही गावांचा शनिवारी (दि, 25) दौरा केला. या वेळी दुष्काळी पट्ट्यातील व शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांनी शिवतारे यांच्यासमोर अडचणींचा पाढाच वाचला. 'बापू, आम्हाला एक वेळ पाणी सोडाच' अशी गळ घातली. दुष्काळावर मात करण्याचा शिवतारे यांचा पुरंदर तालुक्यातील कामांचा दांडगा अनुभव असल्याने अनेक शेतकर्‍यांनी शिवतारे यांच्याकडे पाण्याची विशेष अडचण सांगत समस्या सोडविण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे अलर्ट मोडवर
विजय शिवतारे यांनी मागील काही महिन्यांपासून बारामती, दौंड, भोर, इंदापूर, अशा बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुक्यात दौरे करून कामास सुरुवात केल्याचे दिसते. बारामतीच्या अनेक गावांचा दौराही त्यांनी केला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही अलर्ट होत हळूहळू तालुके पिंजून काढायला सुरुवात केली आहे. सुळे आणि शिवतारे यांचे विविध तालुक्यांत होणारे दौरे पाहता दोघांनीही लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT