शेतकर्‍यांना ‘ई-चावडी’वर ऑनलाईन भरता येणार शेतसारा Pudhari
पुणे

शेतकर्‍यांना ‘ई-चावडी’वर ऑनलाईन भरता येणार शेतसारा

भूमिभिलेख विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा; राज्यात आतापर्यंत 10 हजार गावांची 100 टक्के वसुली

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

पुणे: जमीनविषयक महसूल अर्थात शेतसारा आता ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे. तसेच शेतसारा भरण्याची नोटीस महाभूमी संकेतस्थळावरील ई-चावडीवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरता येणार आहे. दरम्यान, राज्यातील एकूण 35 हजार 837 गावांची शेतसारा मागणी निश्चिती प्रक्रिया पूर्ण झाली असून, 10 हजार 389 गावांची शेतसार्‍याची 100 टक्के वसुली पूर्ण झाली आहे.

राज्यातील शेतकर्‍यांकडून शेतसारा महसूल वसुलीसाठी तलाठ्यांना घरोघरी फिरावे लागत होते. तसेच या महसूल कराची वसुली वेळेवर होत नव्हती. त्याचप्रमाणे किती महसूल थकीत याची माहितीदेखील खातेदारांना नसते.

या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली. या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनुसार किंवा खातेदारनिहाय वर्षाकाठी शेतसार्‍याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे, याची माहिती ई-चावडीवर ऑनलाईन दिसेल. तसेच याची प्रत शेतकर्‍यांना डाऊनलोडसुद्धा करता येणार आहे.

भूमिअभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे. शेतीचा कर भरण्याबरोबरच बिनशेती कर अर्थात एनए करसुद्धा भरण्याचा पर्याय येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शेतसार्‍याची वसुली ब्रिटिशकाळापासून

शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येणारा शेतसारा हा पारंपरिक कर आहे. ब्रिटिश काळापासून हा कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता; मात्र कालांतराने प्रगती होत गेली, तसे नवनवीन कराची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनीवर आकारला जाणार्‍या या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची आकारणी होत असते.

शेतसारा भरणे सोयीचे होणार

अनेक खातेदार हे शहरात राहतात, तर काही खातेदार नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. त्यामुळे या नागरिकांना आपल्या जमिनीच्या कराची (शेतसारा) माहिती मिळत नाही, अशा नागरिकांना आता ऑनलाईन कर भरणे सहजशक्य होणार आहे. ई-चावडीवर शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्याची बाब 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT