पारगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊसपिकासाठी शेतकर्यांकडून स्प्रिंकलर, ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. पाण्याची बचत होऊन उत्पादनात चांगली वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तालुक्याच्या पूर्वभागात भीमाशंकर साखर कारखान्याची निर्मिती झाल्यापासून ऊसपिकाकडे कल वाढला आहे. कारखान्याकडूनही उसाला सातत्याने चांगला दर मिळत आहे. यामुळे इतर पिकांच्या तुलनेत ऊसपिकाकडून खात्रीशीर शेतकर्यांना पैसे मिळतात. परिणामी, उसाचे पीक शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतकरी आता ऊसपिकासाठी स्प्रिंकलर, ठिबक सिंचनाचा सर्रास वापर करताना दिसत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या तालुक्याच्या पूर्वभागात पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे या परिसरात अनेक शेतकर्यांनी शेततळे खोदलेली आहेत. शेततळ्यांमध्ये विहिरी, नदी, कुपनलिकांमधील पाणी साठवले. साठवलेल्या पाण्याचा आता उन्हाळी हंगामातील पिकांना चांगला उपयोग होत आहे. शेतकर्यांनी उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, झेंडू, कोबी, फ्लॉवर ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र पाणीटंचाईचे संकट असते. परंतु परिसरातील शेतकर्यांनी खोदलेल्या शेततळ्यांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांची पाण्याविषयीची चिंता पूर्णपणे मिटली आहे.
परिसरात ऊसक्षेत्रात मोठी वाढ झाल्याने बिबट्यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उसाला पाणी देताना बिबट्यांचे दर्शन शेतकर्यांना होते, त्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशावेळीही पिकासाठी स्प्रिंकलर, ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरत आहे. ऊसतोडणीनंतरही स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाच्या नळ्या, इतर साहित्याचा इतर पिकांना चांगला उपयोग
होतो.