पुणे

नानगाव : तलाठी वेळेवर येत नसल्याने शेतकरी अडचणीत

अमृता चौगुले

नानगाव (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कानगावयेथे गावकामगार तलाठी येत नसल्यामुळे शेतकर्‍यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांना होणार्‍या अडचणींचा विचार करून कानगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने दौंड तहसीलदारांना निवेदन देऊनही परिस्थिती तशीच असल्याची व्यथा व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, 7/12 वरील पीकपाहाणी अद्यावत करावेत तसेच गावकामगार तलाठी नियमित कानगाव सजामध्ये हजर राहून ई-करार नोंदी 7/12 उतार्‍यावर घेण्यात यावेत, शेतकर्‍यांना कर्जाची व्यवस्था करण्यासाठी सोसायटीला 7/12, 8 अ सह ई-करार नोंदणे आवश्यक असते. मात्र, तलाठी नसल्याने ई-करार नोंद व 7/12 पीकपाहाणी होत नाही तोपर्यंत कर्ज उपलब्ध होत नाही, असे निवेदनात म्हटल्याचे सोसायटी अध्यक्ष राजेंद्र गवळी यांनी सांगितले. निवेदनात याबाबत तीव— आंदोलनाचा इशाराही दिल्याचे म्हटले आहे.

तलाठी नॉट रिचेबल
शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीबद्दल गावकामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. .

तहसीलदारांना यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देऊनही गावकामगार तलाठी गावात वेळेवर येत नसल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

              – राजेंद्र गवळी, चेअरमन कानगाव वि. का. स. सोसायटी.

SCROLL FOR NEXT