शेतकर्‍यांना गंडा घालण्याचा नवा फंडा File Photo
पुणे

KYC Fraud : ‘केवायसी’च्या नावाखाली शेतकर्‍यांना गंडा

सायबर चोरट्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होण्याचे प्रकार

पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामार्फत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या (पीएम किसान योजना) योजनेची लिंक पाठवून शेतकर्‍यांना केवायसी करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत. शेतकर्‍यांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांसंदर्भात सोशल मीडियावर माहिती पुरवली जाते. यामध्ये अर्ज भरणे, केवायसी करण्यासह आधार लिंक, संबंधित योजनेचे हप्ते बँकेमध्ये कधी जमा होणार आहेत, यासंदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा होतो. याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी शेतकर्‍यांना गंडा घालण्याचा नवा फंडा शोधला आहे.

सर्वप्रथम शेतकर्‍याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक पाठविण्यात येते. एखाद्याने ती लिंक ओपन केल्यास मोबाईलमध्ये बनावट पीएम किसान नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर शेतकर्‍यांचा मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होते. मोबाईल आणि सीमकार्डचा कंट्रोल घेतला जातो. त्यानंतर ओटीपी येण्यास सुरुवात होते आणि आपोआप फोन पे किंवा गुगल पे अ‍ॅपमधून पैसे पाठविल्याचे (बँक खाते) संदेश येतात. तसेच, व्हॉट्सअ‍ॅपचा प्रोफाईल फोटो घेऊन तो अश्लील चित्रफितीत वापरून संबंधित व्यक्तीस ब्लॅकमेल केले जात असून, पैशाची वारंवार मागणी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. अनेक शेतकर्‍यांची यामध्ये फसवणूक झाली असून, मोठा आर्थिक फटका सोसावा लागलेला आहे.

काय करावे आणि करू नये

अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पीएम किसान नावाने लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ती लिंक कोणीही ओपन करू नये. हा मोठा स्कॅम आहे, त्यामुळे आपल्या बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले जातात. असे घडल्यास तातडीने आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद करून अ‍ॅप मोबाईलमधून डिलीट करावे. तसेच फोन पे व गुगल पेला जोडलेले बँक खाते अनलिंक करावे. सायबर शाखेकडे तक्रार करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT