पुणे

पुरंदरमधील शेतकर्‍यांना मिळेना शेतीसाठी पाणी

अमृता चौगुले

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : आम्हाला मत द्या, तुमच्या सर्व अडचणी पक्ष मार्गी लावेल, अशी आश्वासने शेतकर्‍यांना निवडणुकीदरम्यान दिली जातात. मात्र, प्रत्यक्ष अडचणीच्या काळात शेतकर्‍यांचा कोणीही वाली नसल्याचा प्रत्यय पुरंदर उपसा योजनेच्या नियोजनशून्य कारभारामुळे या लाभक्षेत्रात दिसून येत आहे.

पुरंदरचा पूर्वपट्टा तसा दुष्काळी म्हणूनच ओळखला जायचा. पुरंदर उपसा योजना सुरू झाल्यापासून शेतीत काहीसा बदल झाला आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतीला पुरंदर उपसाच्या अधिक पाण्याची गरज भासत आहे. मात्र, योजनेच्या अधिकार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नायगाव, माळशिरस, पोंढे, राजुरी पट्ट्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. वेळेला पाणी मिळणे गरजेचे असताना योजनेत होणारा वारंवार बिघाड डोकेदुखी ठरत आहे.

बारामती तालुक्याला याच योजनेच्या पाण्याचे वारंवार प्राधान्याने अधिकचे माप दिले जाते. पुरंदरवर मात्र नेहमीप्रमाणे पाणीवाटपात सावत्र वागणूक मिळत आहे. पुरंदरचा शेतकरी पाणी पाणी करतोय तर बारामतीत पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. पुरंदरमधील प्रत्येक निवडणुकीत शेतीचे पाणी हा कळीचा मुद्दा ठरतो. या वेळी एकदा मत द्या, अमुकतमुक वेळी पाण्याची कमतरता भासू देणार नाही, अशी अनेक पोकळ आश्वासने दिली जातात. प्रत्यक्ष गरज येते, तेव्हा मात्र शेतकर्‍याला कोणीही वाली नसल्याचा प्रत्यय येतो. पुरंदर उपसाचे लाभक्षेत्र असलेल्या नायगाव, पोंढे, राजुरी,माळशिरस व परिसरात सध्या पाण्याची गंभीर समस्या बनली आहे. जनावरांच्या चार्‍याचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. उभी पिके वाळून चालली आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

सध्या पाण्याची मागणी अधिक आहे. काहीसा बिघाड होत असल्याने उशीर होत आहे. तसेच नायगावचा भागही उंच असल्याने थोडा उशीर होतोय. बारामती, पुरंदरसाठी वेगवेगळे पंप सुरू करतोय. रविवारपर्यंत नायगाव,पोंढे भागाला पाणी देण्याचा प्रयत्न करू.

          – महेश कानेटकर, कार्यकारी अभियंता, पुरंदर उपसा सिंचन योजना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT