file photo 
पुणे

पारगाव : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

अमृता चौगुले

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना पारगाव (ता. आंबेगाव) येथील तनिष्का मंगल कार्यालयालगत शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. राजाराम कोंडिबा थोरात (वय 60) असे जखमी शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारगाव फाट्याजवळ कौठ मळा आहे. तेथे माजी सैनिक राजाराम कोंडिबा थोरात हे शेतकरी राहतात. तनिष्का मंगल कार्यालयाजवळ त्यांची उसाची शेती आहे.

दुपारी ते उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. राजाराम थोरात यांच्याजवळ त्यांचे पाळीव कुत्रे होते. अचानक हल्ला झाला तरी देखील प्रसंगावधान राखून थोरात यांनी जोरदार प्रतिकार केला. या वेळी बिबट्या व त्यांच्यात जोरदार झटापट झाली.

बिबट्याने शेतकरी थोरात यांच्या दोन्ही हातांना व पायांना पंजा मारून जखमी केले. थोरात यांनी जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्या तिथून उसाच्या शेतात पळून गेला. या घटनेची खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक साईमाला गीते घटनास्थळी हजर होऊन जखमी राजाराम थोरात यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे व माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी जखमी राजाराम थोरात यांची विचारपूस केली. परिसरात मागील महिन्यात मेंढपाळावर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला होता, परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरीवर्गात घबराट पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT