व्हॉट्सॲप तक्रारीनंतर शेतकऱ्याला मिळाले थकीत ९० हजार Pudhari
पुणे

Pune Market Yard farmer complaint: व्हॉट्सॲप तक्रारीनंतर शेतकऱ्याला मिळाले थकीत ९० हजार; बाजार समितीची तत्पर कारवाई

आठ महिन्यांपासून थकलेले कांदा विक्रीचे पैसे २४ तासांत मिळाल्याने शेतकऱ्याचा आनंद; मार्केट यार्ड प्रशासनाचा प्रभावी हस्तक्षेप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्डात विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तब्बल आठ महिन्यांपासून मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने व्हॉट्‌‍सॲपद्वारे बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाने शेतकऱ्याच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत अडत्याला जाब विचारत कार्यवाही केली आणि शेतकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे मिळवून दिले. तक्रारीनंतर 24 तासांत थकलेले 90 हजार रुपये हाती पडताच शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.(Latest Pune News)

केंदूर (ता. शिरूर) येथील मारुती रामचंद्र साकोरे यांनी पिकवलेला कांदा मार्केट यार्डात विकला. मात्र, आठ महिने लोटूनही अडतदाराने पैसे न दिल्याने ते चिंतेत होते. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बाजार समितीकडे तक्रार करता येते. तसेच, बिल मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर साकोरे यांनी बाजार समितीच्या फळ-भाजीपाला व कांदा-बटाटा विभागप्रमुख प्रशांत गोते संपर्क साधला. त्यांनी शेतकऱ्याला व्हॉट्‌‍सॲपद्वारे अर्ज पाठवण्यास सांगितले. अर्ज मिळताच संबंधित आडत्याला कार्यालयात बोलावून पैसे देण्याबाबत चौकशी केली. आडत्याने त्वरित रक्कम देण्यास सहमती दर्शवली आणि साकोरे यांनी स्वयं उपस्थित राहून आपले 90 हजार रुपये स्वीकारले.

बाजार आवारात शेतकऱ्याने शेतीमालाची विक्री केल्यास एखाद्या आडत्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली, पैसे दिले नाही तर ते पैसे काढून देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांचे पैसे काढून देण्याची प्रक्रीया बाजार समितीकडून केली जाईल.
प्रशांत गोते, फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभागप्रमुख, पुणे बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT