पुणे

‘पुढारी’च्या रामलीला कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध..

Laxman Dhenge

पिंपरी : राम रंगी रंगले मन अभंग, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले, चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले, भाव तरंग भंगले, अंतरंग दंगले, अशा एकापेक्षा एक सरस अभंग आणि रामगीतांमध्ये पिंपरी- चिंचवडवासीय रामनामात रंगले होते. भारतरत्न भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी यांनी रविवार (दि. 21) आकुर्डी प्राधिकरण येथे ग.दि. माडगूळकर सभागृहात दैनिक पुढारी आयोजित रामलीला कार्यक्रमात आपल्या स्वराविष्कराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या स्वरमैफलीतून निखळ भक्तीची अनुभूतीच जणू रसिकांना मिळाली. रामलीला कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सभागृहात रसिक प्रेक्षकांची गर्दी झाली होती. पिता-पुत्राच्या एकापाठोपाठ रचना सादर झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनीदेखील श्रीराम नामाच्या जयघोषात टाळ्यांची दाद दिली. सर्व सभागृहात श्रीराम नामाचा जयघोष आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. अयोध्यानगरी राम मंदिर उद्घाटन तसेच रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेसाठी तयार झाले आहे. सोमवारी (दि. 22) होणार्‍या प्राणप्रतिष्ठा उत्सवाची अनुभूती देण्यासाठी रामलीला या कार्यक्रमात श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी यांनी गायनसेवा दिली. सर्वप्रथम श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी यांनी जय श्रीराम या भक्तिगीताने सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी 'राम का गुनगान करीये' ही भक्तिरचना सादर केली. गायन सादर करत असताना श्रीनिवास जोशी यांनी पं. भीमसेन जोशी व त्यांच्या सहकार्‍यांनी गाणे कशाप्रकारे रचले याबद्दलचे किस्से प्रेक्षकांना सांगितले. यानंतर समर्थ रामदास स्वामींचा अभंग 'रामाचे भजन तेच माझे ध्यान' हा मराठी अभंग गायला. यानंतर अनकही या हिंदी चित्रपटातील 'रघुवर तुमको मेरी लाज' हे गीत सादर केले. त्यांना तबल्यावर प्रसाद जोशी, की- बोर्डवर मिहीर भडकमकर, पखवाज पद्माकर गुजर, हार्मोनियमवर अविनाश दिघे, माऊली टाकळकर यांनी टाळ वर साथसंगत केली.

या प्रसंगी आरोग्य मंत्री तानाजी सांवत, माजी नगरसेवक राजू मिसाळ, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, उद्योजक चंद्रकांत सरडे, भाजप पदाधिकारी तेजस्विनी कदम आदी उपस्थित होते. यानंतर प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सीतारादेवी यांच्या कन्या डॉ. जयंतीमाला मिश्र आणि त्यांच्या सहकलाकारांनी रामलीला हे नृत्य नाटक कथ्थक, भरतनाट्यम व ओडिसी या शास्त्रीय नृत्याविष्कारांचा सुमधुर संगम साधून श्रीरामाच्या जन्मापासून अयोध्या पुनरागमनाचा प्रवास संगीतमय नाट्य स्वरूपात सादर केला. त्यापूर्वी अर्चना गायकवाड यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी यांचा सत्कार तानाजी सांवत यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. जयंतीमाला मिश्र आणि त्यांच्या सहकलाकारांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. पिंपरी पुढारीचे आवृत्ती प्रमुख किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. पौर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले.

रामनामाचा जयघोष

रामलीला कार्यक्रमात प्रेक्षकांनी भक्तीमय वातावरणात राम नामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा आंनद लुटला. यावेळी श्रीनिवास जोशी, विराज जोशी यांच्या सुमधूर आवाजात श्रीराम गीते ऐकताना रसिक श्रोते तल्लीन झाले होते. एक गाणे संपताच प्रेक्षकांच्या मुखांतून 'श्रीराम चंद्र की जय' चा जयघोष होत होता. यामुळे अवघे नाट्यगृह राम नाममय झाले होते. अशा प्रसन्न वातावरणामुळे गायक पिता-पुत्राच्या मुखांतून एकाहून एक सरस रामगीते ऐकण्याचा आनंद प्रेषकांना मिळाला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT