पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे बोगस जामीनदाराला उभे करून कारागृहातून गुन्हेगारांना बाहेर काढणार्या बनावट जामीनदारांच्या टोळीचा पर्दाफाश वानवडी पोलिसांनी केला. गुन्ह्यातील महत्त्वाची भूमिका बजावणार्या दोन वकिलांसह अकरा जणांना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे निरीक्षक गोविंद जाधव तसेच तपास अधिकारी धनाजी टोणे उपस्थित होते. या प्रकरणात रविवारी रात्री अॅड. अस्लम गफुर सय्यद (वय 45) आणि अॅड. योगेश सुरेश जाधव (वय 43) या दोन वकिलांना अटक करण्यात आली. यापूर्वी बनावट जामीनदार म्हणून उभ्या राहिलेल्या संतोषकुमार तेलंग, संजय पडवळ, सुभाष कोद्रे, ज्ञानेश्वर शिंदे, सुजित सपकाळ, भोपाळ कांगणे, जितेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीनंतर कारागृहात रवानगी केल्यानंतर गुन्हेगारांना कोणी लायक जामीनदार मिळत नव्हते. म्हणून न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी काही वकिलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचे रॅकेट निर्माण झाले होते. हे बनावट जामीनदार न्यायालयात आलेल्या गुन्हेगारांच्या नातेवाइकांना हेरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत.
त्यानंतर ही टोळी बनावट जामीनदार यांचे दुसर्याच नावाने आधार कार्ड, रेशनकार्ड व ऑनलाइन 7/12 वरील नावात बदल करून ती कागदपत्रे तयार करत होते. रेशनकार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांचे रबरी स्टॅम्प मारून खोटी सही करत होते.
त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करून संबंधित कोर्टातील नाझर यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करून खरे असल्याचे दाखवत. न्यायालयासमोर जामीनदारांना हजर केल्यानंतर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणत होते. तसेच, न्यायालयाची दिशाभूल करून गुन्हेगारांना जामीन मिळवून देत असत.
बनावट जामीनदारांचा विषय वारंवार कानावर येत असताना दि. 4 जानेवारी रोजी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात सापळा लावून संतोषकुमार तेलंग याच्यासह पाच बनावट जामीनदारांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी फरहान ऊर्फ बबलू शेख या वेळी पळून गेला.
सहा आरोपी अटक करून त्यांच्याकडे तपास करण्यात आला. त्यामध्ये फरहान शेख याला बनावट व चोरून रबरी शिक्के तयार करून देणारा दर्शन शहा याला अटक करून त्याच्याकडून नऊ रबरी स्टॅम्प व मशिन जप्त करण्यात आली. तसेच, रेशनकार्ड देणारे पिराजी शिंदे, गोपाळ कांगणे यांनाही अटक झाली. त्यांच्याकडून 95 संशयित रेशनकार्ड, 11 बनावट आधार कार्ड, मोबाईल हँडसेट, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
संतोषकुमार तेलंग याने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानंतर फरहान शेख, अॅड. अस्लम सय्यद यांची नावे निष्पन्न झाली. या कारवाईत पोलिस अंमलदार अमोल पिलाणे, दया शेगर, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, सोमनाथ कांबळे यांनी सहभाग घेतला.
वकिलांना अटक केल्याचा निषेध
बनावट जामीन घोटळ्यात वकिलांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वकील वानवडी कोर्ट आवारात जमा झाले होते. त्यांनी या वेळी वकिलांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला.
सहभागी असणारे रडारवर
सध्या या बोगस जामीनदाराची 24 प्रकरणे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या जामीन घोटाळ्यात आणखी सहभागी असणारे यानिमित्त रडारवर आले आहेत. बनावट जामीनदार तसेच बोगस खरेदीखते यामध्येही बनावट जामीनदार उभे केले असण्याची शक्यता पाहता, चौकशी होण्याची शक्यताही यानिमित्त वाढली आहे.
गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन देण्यासाठी बोगस जामीनदार मुंबई, ठाणे तसेच ग्रामीण भागातून बोलावून त्यांची बनावट कागदपत्रे बनविल्याचे निष्पन्न झाले आहे. कोर्टाच्या नाझरला हाताशी धरून वकिलांनी न्यायालयाने भरण्यास सांगितलेल्या जातमुचलक्याच्या ठरलेल्या किमतीइतकी रक्कम गुन्हेगारांच्या नातेवाइकांकडून उकळली जात होती. ही रक्कम घेतल्यानंतर त्यातील काही रक्कम बनावट जामीनदारांना वाटून उर्वरित रक्कम वकील आपल्याकडे ठेवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.- राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त