लोणी काळभोर: महसूल विभागालाच चकवा देत बनावट अकृषिक परवानगी, फाळणीबारा, आकारफोड पत्रक आणि सातबारा नोंदींसाठी बनावट शासकीय आदेश तयार करणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे.
या गंभीर प्रकारामुळे पूर्व हवेलीतील भूमाफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस चौकशीत अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर केला आहे.
लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्य क्षेत्रातील केसनंद येथील ग््रााम महसूल अधिकाऱ्याकडे 12 मार्च रोजी कोलते यांच्या सहीचे कथित पत्र प्राप्त झाले होते. या पत्रासोबत अकृषिक परवानगी, फाळणीबारा, आकारफोड आणि सातबारा नोंदी घेण्यासंदर्भातील विविध आदेश व संपूर्ण संचिका जोडण्यात आली होती. संबंधित संचिकेमध्ये अर्जदार म्हणून बाबासाहेब तुकाराम हरगुडे यांचे नाव होते. मात्र, ग््रााम महसूल अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची माहिती अप्पर तहसील कार्यालयास दिली.
तहसीलदार कोलते यांनी सर्व दस्तऐवजांची पडताळणी केली असता हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या नावाने वापरण्यात आलेले पत्र बनावट असल्याचे तसेच संबंधित आदेश या कार्यालयातून दिले न गेल्याचे उघड झाले. याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या नावाने वाणिज्य प्रयोजनासाठी देण्यात आलेली कथित अकृषिक परवानगी देखील संशयास्पद होती.
विशेष म्हणजे केसनंद गाव हे लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यक्षेत्रात येत असताना हवेली तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार दाखविण्यात आला होता. इतकेच नव्हे तर हवेली तहसीलच्या पत्रावर अप्पर तहसीलदारांची कथित सही वापरण्यात आली होती. भूमी अभिलेख विभागाच्या नावाने फाळणीबारा व आकारफोड नोंदींबाबत करण्यात आलेला पत्रव्यवहारही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
संपूर्ण प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर तहसीलदार कोलते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला. प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, बनावट शासकीय आदेश तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.
भूमाफियांचे जाळे पुन्हा चर्चेत
पूर्व हवेली परिसरात गेल्या काही वर्षांपासून बेकायदा प्लॉटिंग, बनावट दस्तऐवज, खोटे सातबारा उतारे आणि महसुली अभिलेखांमध्ये फेरफार करून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, प्रत्येक वेळी काही दिवसात ही प्रकरणे थंड बस्त्यात जातात अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयाने दाखवलेली तत्परता महत्त्वाची मानली जात आहे. महसूल विभागाने या भूमाफियांवर कठोर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस चौकशीत बनावट आदेश तयार करणाऱ्या टोळीमागील सूत्रधार, महसुली कागदपत्रांमध्ये फेरफार करणारे दलाल, तसेच या रॅकेटला संरक्षण देणारे तथाकथित बडे मासे उघड होणार का? याकडे पूर्व हवेलीचे लक्ष लागले आहे.
कागदपत्रांची तपासणी
अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर यानी केसनंद येथील अहवाल दिला आहे. अहवालातील कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर अप्पर तहसील कार्यालयास यांना योग्य त्या कारवाईबाबत सूचना देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.