Surrender Pudhari
पुणे

Fake Extortion Case Surrender: खोट्या POSCO गुन्ह्याची धमकी देऊन 2 कोटींची खंडणी; दाम्पत्याने शेवटी केले आत्मसमर्पण!

जुनर न्यायालयाने पतीला 7 दिवसांची पोलिस कोठडी; इतर ठिकाणीही अशाच गुन्ह्यांची शक्यता—ओतूर पोलिसांचा सखोल तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दाम्पत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर ओतूर पोलिसांनी त्यांना अटक केली. ही माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 15 मे 2025 रोजी खामुंडी (ता. जुन्नर) येथील रहिवासी मारुती मनोहर कदम (वय 61) यांनी ओतूर पोलिसात एका दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये हे दाम्पत्य, त्यांची अल्पवयीन मुलगी तसेच आणखी एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना पोस्को व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याचे नमूद केले होते. याबाबत ओतूर पोलिस ठाण्यात त्याच दिवशी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व फिर्यादी यांचेकडून दीड कोटी रुपयांचे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे तीन चेक घेतले असून, उर्वरित 50 लाख रुपयांची कदम यांच्याकडे वारंवार मागणी केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दाम्पत्याने जुनरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

त्यानंतर या दाम्पत्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई येथे देखील अर्ज केला. उच्च न्यायालयात याप्रकरणी 20 वेळा सुनावणी झाली. तेथे देखील या दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजुर न झाल्याने त्यांनी सोमवारी (दि. 24) ओतूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पन केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

ओतूर पोलिसांनी या दाम्पत्याला मंगळवारी (दि. 25) जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले. न्यायालयाने यातील पतीस 7 दिवस पोलिस कोठडी मंजूर केली. त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत का? याबाबत ओतूर पोलिस सखोल तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT